
PM Modi and Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवारांना आज रुग्णालयातून सोडण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार देखील आहेत. रुग्णालयातून शरद पवार थेट मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे रवाना झाले. दरम्यान, रुग्णालयातून डिस्चाज मिळाल्यावर शरद पवार यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करत तब्येतीची विचारपूस केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देखील दिला.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
नरेंद्र मोदींनी अत्यंत प्रेमाने, शरदराव, तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम करू. तुम्ही विश्रांती घ्या आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा, मार्ग दाखवत राहा. तुम्ही काळजी घेणे आणि या गोष्टींपासून थोडे दूर राहणे गरजेचे आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहावे हीच आमची इच्छा आहे, तुमचा सल्ला आम्हाला मिळत राहो आणि तसेच तुम्ही तंदुरुस्त राहा, असा सल्ला देत विचारपूस केली.
Navnath Ban: भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत, बुधवारी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत ...
शरद पवार यांची 2 ऑक्टोबर रोजी प्रकृती खालावली होती. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. शरद पवार दुष्काळी दौऱ्यावरती होते, त्यावेळी उन्हामुळे आणि अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने शरद पवारांना कफ झाला होता. तसेच त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, विविध चाचण्याही करण्यात आल्या होत्या. त्यांची प्रकृती आता स्थिर झाल्याने त्यांना दोन दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यापासून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही नावाचा समावेश झाला. आज सकाळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना कॉल केला. तब्ब्येतीची विचारपूस करत आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.





