Wednesday, November 4, 2026

Congress MP Viral Video: श्यामकुमार हे वागणं बरं न्हवं...! काँग्रेस खासदाराने महिला खासदाराला मारली चापट; व्हिडिओ वायरल

रामलीला मैदानाकडे जात असताना काँग्रेसच्या खासदारांसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. या बस प्रवासादरम्यान रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात एक प्रसंग घडला.

दिल्लीत १ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने रामलीला मैदानावर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची यात मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र, या आंदोलनापेक्षा सध्या राजकीय वर्तुळात रॅलीदरम्यान काँग्रेस खासदारांच्या बस प्रवासात घडलेल्या एका अंतर्गत प्रसंगाची जोरदार चर्चा रंगली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रामलीला मैदानाकडे जात असताना काँग्रेसच्या खासदारांसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. या बस प्रवासादरम्यान रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात एक प्रसंग घडला. एका व्हायरल झालेल्या १० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, खासदार श्याम कुमार बर्वे हे उभे राहून त्यांच्या बाजूला बसलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना हलकी चापट मारताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला खासदार धानोरकर यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, परंतु काही क्षणांत त्या बर्वे यांच्याकडे काहीशा संतापलेल्या नजरेने पाहताना आढळतात. हा व्हिडिओ बसमधीलच एका पदाधिकाऱ्याने चित्रित केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हा व्हिडिओ काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात आणि सोशल मीडियावर वेगाने प्रसारित झाल्यानंतर पक्षातील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या घटनेबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी, संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्राचे प्रभारी सिरीवेला प्रसाद यांना अधिकृत ईमेलद्वारे सविस्तर तक्रार पाठवण्यात आली आहे. या तक्रार अर्जात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काही अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील मुद्दे उपस्थित केले आहेत. पक्षश्रेष्ठींनी या घटनेची तात्काळ दखल घ्यावी आणि संबंधित खासदारावर कठोर अनुशासनात्मक कारवाई करावी, अशी ठाम मागणी पत्रात करण्यात आली आहे.

काँग्रेसमधील पक्षातील खासदारांच्या अशा वादांमुळे वरिष्ठ नेत्यांची अडचण झाली आहे. याआधीही स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमुळे नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळाले आहेत, मात्र दिल्लीतील राष्ट्रीय आंदोलनादरम्यान घडलेल्या या प्रकरणाने अधिक तणाव निर्माण केला आहे. सध्या हा व्हिडिओ राजकीय विश्लेषक आणि प्रतिस्पर्धी पक्षांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित खासदारांवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >