मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या तब्बल 9 विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी आता अधिक वेगवान झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष चौकशी आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या व्यक्ती, परीक्षार्थी, विद्यार्थी किंवा नोंदणीकृत संस्थांकडे या प्रकरणाशी संबंधित कोणतीही ठोस माहिती, पुरावे किंवा तक्रारी आहेत, त्यांनी आपले म्हणणे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, निवेदन सादर करण्यामध्ये पूर्ण सुस्पष्टता आणि पारदर्शकता राहावी, यासाठी प्रतिज्ञापत्राचा एक निश्चित नमुना तयार करण्यात आला आहे. संबंधितांनी आपली निवेदने केवळ मराठी किंवा इंग्रजी भाषेत आणि नोटराईज्ड प्रतिज्ञापत्रासोबतच आयोगाकडे पाठवणे बंधनकारक असणार आहे. सर्व कागदपत्रे आणि पुरावे जमा करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पडले की चाहत्यांचा लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू होतो. कारण सारा ...
निवेदन कुठे व कसे सादर करावे?
तक्रारदार किंवा माहिती देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र, सविस्तर निवेदन, संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती आणि एका वैध ओळखपत्राची प्रत खालील पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे:
- कार्यालयाचा पत्ता: अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्रमांक 201, दुसरा मजला, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400051.
तसेच, प्रत्यक्ष कागदपत्रे पाठवण्यासोबतच नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि सर्व संबंधित कागदपत्रांची एक डिजिटल प्रत (PDF) आयोगाच्या अधिकृत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर देखील पाठवणे अनिवार्य आहे.
संपर्क व मदतीसाठी सुविधा
तक्रारी दाखल करताना किंवा प्रतिज्ञापत्र तयार करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष सोय केली आहे. यासंदर्भातील कोणतीही आवश्यक माहिती किंवा मदतीसाठी नागरिकांनी 022-20867677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव मुंढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या या संवेदनशील प्रकरणात आता चौकशी आयोग काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.