Tamil Nadu Unique Diwali : दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतषबाजी, आकाशात उडणारे रॉकेट आणि रोषणाईने उजळलेले वातावरण डोळ्यांसमोर येते. देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, भारतात असे एक गाव आहे, जिथे गेल्या जवळपास १०० वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडले जात नाहीत. तामिळनाडूतील पेरम्बूर गावाची ही अनोखी दिवाळी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
वटवाघळांचा गावकऱ्यांना लळा
तामिळनाडूतील मयिलादुथुराई जिल्ह्यात पेरम्बूर नावाचे एक गाव आहे. या गावात 'वव्वाल थोप्पू' म्हणजेच वटवाघळांची बाग म्हणून ओळखले जाणारे एक ठिकाण आहे. येथे सुमारे १५० वर्षे जुने एक विशाल वडाचे झाड असून त्यावर शेकडो वटवाघळांचा अधिवास आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या काळात फटाक्यांचा मोठा आवाज आणि त्यातून निर्माण होणारा धूर या वटवाघळांसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या मुक्या जीवांचे संरक्षण करण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक पिढ्यांपासून दिवाळीत फटाके न फोडण्याची परंपरा जपली आहे.
स्वतःचा आनंद बाजूला ठेवून जपला वटवाघळांची सुरक्षितता
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला, तरी आपल्या आनंदासाठी निसर्गातील इतर जीवांना त्रास होऊ नये, याची काळजी पेरम्बूरमधील ग्रामस्थ घेतात. गावातील नागरिक दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करत नाहीत. त्याऐवजी घरासमोर पणत्या लावतात, मंदिरात जाऊन पूजा करतात आणि साधेपणाने दिवाळी साजरी करतात. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते.
Narak Chaturdashi 2026 : दिवाळीतील नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी हा सण विशेष धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ...
पर्यावरणाच्या रक्षणात वटवाघळांचीही महत्त्वाची भूमिका
वटवाघळे ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जीवसृष्टी आहे. अनेक प्रजातींची वटवाघळे फळे खाऊन त्यांच्या बिया वेगवेगळ्या ठिकाणी पसरवतात. काही प्रजाती परागीभवनाच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जंगलांचे पुनरुज्जीवन आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. वटवाघळे प्रामुख्याने दिवसा झाडांवर विश्रांती घेतात आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. अशा वेळी फटाक्यांचा मोठा आवाज, धूर आणि मानवी हालचाली यांमुळे त्यांच्या अधिवासावर परिणाम होऊ शकतो.
तामिळनाडूमधील पेरम्बूरप्रमाणेच कळुपेरुम्पक्कम आणि किट्टमपालयम यांसारख्या गावांमध्येही वन्यजीवांच्या संरक्षणासाठी संवेदनशीलता दाखवली जाते. सण साजरा करताना निसर्गाची आणि मुक्या प्राण्यांची काळजी घेण्याचा संदेश या गावांमधून दिला जात आहे.
माणुसकीचा आणि निसर्गप्रेमाचा सुंदर संदेश
दिवाळी म्हणजे केवळ दिवे, रोषणाई आणि फटाके नव्हेत, तर आनंद वाटण्याचा आणि इतरांच्या जीवनाचाही विचार करण्याचा सण आहे. पेरम्बूर गावातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपलेली ही परंपरा त्याचेच उत्तम उदाहरण आहे. स्वतःचा आनंद साजरा करताना मुक्या जीवांचे घर उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी संपूर्ण गावाने घेतलेली भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. पेरम्बूरची ही अनोखी दिवाळी प्रत्येकाला पर्यावरणाचे महत्त्व आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची जाणीव करून देते.