
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आनंद आणि नवीन कपड्यांची खरेदी नव्हे, तर आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याचा आणि माणुसकीचा प्रकाश सर्वत्र पसरविण्याचा सण आहे. हाच दिवाळीचा खरा अर्थ कृतीतून जपत केडगाव येथील जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आरणगाव येथील मानव सेवा प्रकल्पातील वंचितांसोबत दिवाळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत किराणा साहित्य, कपडे, अन्नधान्य, साफसफाईचे साहित्य तसेच दैनंदिन वापरातील विविध जीवनावश्यक वस्तू भेट देत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.
अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर शहर उपविभागातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले किंवा चोरीला गेलेले एकूण 87 मोबाईल हँडसेट शोधून काढण्यात ...
प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ मदतकार्य न ठरता माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देणारा अनुभव ठरला. या साठी प्राचार्य कटारिया यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या घरून शक्य होईल त्या स्वरूपात मदत घेऊन येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार विविध वस्तू गोळा केल्या. काही विद्यार्थ्यांनी किराणा साहित्य, काहींनी कपडे, तर काहींनी साफसफाईसाठी लागणारे साहित्य आणले. या शिवाय अन्नधान्य आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचाही समावेश करण्यात आला. एकत्रितपणे जमा केलेले हे साहित्य मानव सेवा प्रकल्पातील गरजूंसाठी भेट देण्यात आले.
मानव सेवा प्रकल्पाला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथील वंचितांची परिस्थिती, त्यांचे संगोपन, दैनंदिन गरजा आणि प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांची घेतली जाणारी काळजी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. प्रकल्पाचे कार्य आणि तेथील वंचितांची परिस्थिती जाणून घेताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. विशेष म्हणजे, या भेटीनंतर विद्यार्थ्यांनी केवळ दिवाळीपुरतेच मदतकार्य मर्यादित न ठेवता यापुढे आपले वाढदिवस आणि जीवनातील विविध आनंदाचे प्रसंगही मानव सेवा प्रकल्पातील वंचितांसोबत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमाबद्दल मानव सेवा प्रकल्पाच्या वतीने जेएसएस प्राचार्य कटारिया आणि निकिता कटारिया यांचे विशेष कौतुक करण्यात आले. जेएसएस गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच असे संस्कार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याची भावना प्रकल्पाचे जाधव यांनी व्यक्त केली.





