Friday, November 6, 2026

SBI ची 904 कोटींची फसवणूक? किशोर बियाणी आणि फ्युचर रिटेलविरोधात CBI चा FIR!

स्टेट बँक ऑफ इंडियाची 904.32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने फ्युचर रिटेलचे प्रमुख किशोर बियाणी आणि राकेश बियाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत मुंबईत छापेमारी केली आहे.

मुंबई: देशातील अग्रगण्य रिटेल समूहांपैकी एक असलेल्या 'फ्युचर रिटेल लिमिटेड'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची तब्बल 904.32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने फ्युचर रिटेल लि., कंपनीचे प्रमुख प्रवर्तक किशोर बियाणी आणि राकेश बियाणी यांच्यासह काही अज्ञात सरकारी अधिकारी आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध गंभीर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील एसबीआयच्या शाखेने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने ही मोठी कारवाई केली असून, यामुळे व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

फ्युचर रिटेल लिमिटेड ही कंपनी एकेकाळी 'बिग बाजार', 'फूडहॉल' आणि 'हायपरसिटी' यांसारख्या मोठ्या सुपरमार्केट्स व रिटेल चेन्सच्या माध्यमातून देशातील घराघरांमध्ये पोहोचली होती. मात्र, कंपनीवर कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सीबीआयच्या प्राथमिक अहवालानुसार, आरोपींनी मुंबईतील फोर्ट येथील एसबीआयच्या कमर्शियल शाखेतून आणि इतर 9 बँकांच्या समूहाकडून खेळते भांडवल आणि मुदत कर्जाच्या नावाखाली प्रचंड कर्ज सुविधा मिळवल्या होत्या. मात्र, ज्या उद्देशासाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता, त्याचा वापर न करता तो हेतुपुरस्सर अन्यत्र वळवण्यात आला.

फॉरेन्सिक ऑडिटमधून मोठा पर्दाफाश झाला असून, 1 एप्रिल 2017 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीतील अहवालानुसार 23 मार्च 2026 रोजी फ्युचर रिटेलचे खाते अधिकृतपणे 'फसवणूक' म्हणून घोषित करण्यात आले. कंपनीच्या संचालकांनी आपापसातील संबंधित कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणावर निधी वळवला, ज्यांची कोणतीही आर्थिक क्षमता नव्हती. तसेच, बँकेची दिशाभूल करण्यासाठी हिशोबाच्या पुस्तकांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. 904 कोटींहून अधिकची थकबाकी न भरल्यामुळे कंपनीचे खाते आधीच 26 एप्रिल 2021 रोजी 'एनपीए' म्हणून घोषित झाले होते.

एफआयआर दाखल झाल्यानंतर सीबीआयच्या पथकांनी मुंबईतील फ्युचर रिटेलच्या संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या शोधमोहिमेदरम्यान तपासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे दस्तऐवज आणि पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. या संपूर्ण आर्थिक कटात मदत करणाऱ्या संशयित सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही कसून चौकशी केली जात असून, पैशांचा अंतिम वापर नेमका कुठे झाला, याचा शोध यंत्रणांकडून घेतला जात आहे. या दणक्यामुळे बियाणी बंधूंच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >