Friday, November 6, 2026

Ahilyanagar News: जिल्हा बँकेच्या राजकारणानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली सभापती राम शिंदे यांची भेट, चर्चेमागचं कारण काय?

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभापती राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली.

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज एकाच व्यासपीठावर नाही, तर सभापती राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. विखे यांनी विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमधील संबंध पुन्हा सुरळीत झाले आहेत.

विशेष म्हणजे, ‘जिल्हा बँकेच्या राजकारणात जे झाले ते झाले, आता त्यांनी आमच्याबरोबर यावे, अशी आमची इच्छा आहे.’ असे सूचक विधान विखे यांनी केले. तर ‘त्यावेळी बहुदा त्यांना माझी ताकद माहीत नसेल,’ असा टोला राम शिंदे यांनी लगावला. पालकमंत्री विखे यांनी चोंडी येथे शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत विखे यांनी शिंदे यांच्या मातोश्रींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाली. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर भाजपचे हे बडे नेते एकत्र आले आहेत.

भेटीनंतर बोलताना पालकमंत्री विखे म्हणाले की, ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती. आमच्यात राजकीय विषयांसह जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाली. जिल्हा बँक निवडणुकीचा विषय आता संपला असून, आता शिंदे यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा असल्याचे सांगत विखे यांनी त्यांना एकत्र काम करण्याची साद घातली. दुसरीकडे, शिंदे यांनी या भेटीचे राजकीय महत्त्व अप्रत्यक्षपणे मान्य केले. आम्ही एकाच पक्षात असल्यामुळे काही विषयांवर एकत्र यावेच लागते, असे ते म्हणाले. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान विश्वासात न घेतल्याच्या मुद्द्यावर बोलताना, ‘बहुदा त्यावेळी त्यांना माझी ताकद माहीत नसेल किंवा मला समजून घेण्याची गरज वाटली नसेल.’ असे खोचकपणे बोलत आपण या निवडणुकीत कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिली नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे विखे यांना टोला लगावला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे- थोरात पॅनेलने सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत खासदार निलेश लंके आणि राम शिंदे विरोधी गटात होते. असे असले तरी, शिंदे यांच्या गटाचे दोन प्रतिनिधी संचालक म्हणून निवडून आले आहेत. आगामी 12 नोव्हेंबर रोजी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की, आम्हाला बोलावले तर आम्ही नक्की जाऊ. जिल्ह्याच्या आणि सहकाराच्या हितासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. विखे थोरात पॅनेलकडे 17 जागांचा विजय आणि एकाचा पाठिंबा मिळून पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कोणाच्या मदतीची गरज वाटत नाही. ते पदाधिकारी निवडू शकतात, असे सांगत शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >