Friday, November 6, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडीवासीयांना 557 कुटुंबीयांना घरांच्या चाव्यांचे वितरण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे 500 चौरस स्क्वेअर फुटांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे 500 चौरस स्क्वेअर फुटांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी 557 कुटुंबीयांना घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हा रखडलेला ऐतिहासिक प्रकल्प मार्गी लागल्यानंतर बीडीडी वासियांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळत होते. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चाव्यांचे वितरण करण्यात आल्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला.

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर, लोअर परेलच्या ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील 557 रहिवाशांना सुसज्ज घरांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रहिवाशांना 500 चौरस फुटांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. डिसेंबर 2029 पर्यंत संपूर्ण प्रकल्पातील घरांचे वितरण पूर्ण करण्याची ग्वाहीही शिंदे यांनी दिली. अनेक वर्षे रखडलेला हा देशातील ऐतिहासिक प्रकल्प आता 100 टक्के वेळेत पूर्ण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद सुद्धा साधला.

ते म्हणाले की, “बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार की नाही, अशी चर्चा अनेक वर्षे सुरू होती. मात्र आता 100 टक्के बीडीडी प्रकल्प वेळेत पूर्ण होणार, याची खात्री बाळगा. आमचा पाय ब्रेकवर नसून अॅक्सिलरेटरवर आहे.” पोलिसांच्या घरांची किंमत पूर्वी 50 लाख रुपये निश्चित असताना रहिवाशांच्या मागणीनुसार ती 15 लाख रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सध्याच्या बांधकाम खर्चातील तफावत आणि अन्य सूचनांचाही सकारात्मक विचार केला जाईल. म्हाडा ही नफा कमावणारी संस्था नसून दर्जेदार घरे आणि सुविधा देणारी संस्था आहे. युनिफाइड डीसीपीआरमध्ये बदल करून रखडलेल्या पुनर्विकासाला गती दिली आहे. क्लस्टर विकासातून उद्याने, मोकळ्या जागा, क्लब हाऊस आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.

शापूरजी, टाटा, एल अँड टीसारख्या विकासकांनी गुणवत्ता आणि वेळेचे पालन करावे, सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. रमाबाई आंबेडकरनगरच्या 16 हजार घरांच्या रखडलेल्या प्रकल्पाला एसआरए आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून गती दिली असून मुख्यमंत्री असताना 160 कोटींचे भाडे धनादेशाद्वारे वितरित केले. म्हाडाच्या एक हजार घरांसाठी दीड लाख अर्ज येणे ही गुणवत्तेची पावती आहे.

कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, वरळी-वर्सोवा-मीरा-भाईंदर मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेसवरील उन्नत मार्ग, घोडबंदर बायपास, ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह बोगदा आणि वरळी-शिवडी जोडमार्गामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलत आहे. रेसकोर्सची 125 एकर आणि कोस्टल रोडलगतची सुमारे 150 एकर जागा मिळून 300 एकरांचे जागतिक दर्जाचे उद्यान उभारले जाणार असून तेथे बांधकाम होणार नाही. पुढील 15 ते 20 वर्षांत मुंबई-एमएमआरमध्ये 20 ते 25 लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. परवडणारी व भाडेतत्त्वावरील घरे, महिला कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगारांसाठी निवास व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे 40 लाख घरांचे स्वप्न पूर्ण करून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प असल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.

बीडीडी आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी समाजातील सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही केले. सर्वसामान्य माणूस हाच सरकारच्या कामाचा केंद्रबिंदू असून विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच महायुती सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगत त्यांनी लाभार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >