वैद्यकीय शिक्षणात महाराष्ट्राची मोठी झेप; पदव्युत्तर प्रवेशक्षमतेत 16.3 टक्क्यांची वाढ

Maharashtra Medical Education: पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्राने दमदार झेप घेतली असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणावर विस्तारल्या आहेत.

मुंबई: पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्राने दमदार झेप घेतली असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणावर विस्तारल्या आहेत. यामुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट झाले असून, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढल्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळण्यासह नागरिकांना अधिक सक्षमपणे विशेष उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.


शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये महाराष्ट्रात पदव्युत्तर ब्रॉड स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या एकूण 7 हजार 615 जागा उपलब्ध झाल्या आहेत. देशातील आघाडीच्या 10 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने द्वितीय स्थान पटकावले आहे. गतवर्षीच्या 6 हजार 549 जागांच्या तुलनेत यंदा 1 हजार 66 जागांची म्हणजेच 16.3 टक्क्यांची निव्वळ वाढ झाली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आजची वाढलेली पदव्युत्तर प्रवेशक्षमता ही उद्याच्या सक्षम आरोग्यव्यवस्थेचा पाया असून, याद्वारे अधिक तज्ज्ञ डॉक्टर घडतील, वैद्यकीय संशोधनाला चालना मिळेल आणि शासकीय रुग्णालयांची उपचारक्षमता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) 6 नोव्हेंबर 2026 रोजी अद्ययावत केलेल्या आसन मॅट्रिक्सनुसार, कर्नाटक राज्य 8 हजार 862 जागांसह देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडू 6 हजार 678, उत्तर प्रदेश 6 हजार 675, तेलंगणा 4 हजार 403 आणि आंध्र प्रदेश 4 हजार 309 जागांसह पुढील स्थानांवर आहेत. तसेच राजस्थानमध्ये 3 हजार 950, गुजरातमध्ये 3 हजार 801, मध्य प्रदेशात 3 हजार 277 आणि पश्चिम बंगालमध्ये 2 हजार 354 जागा उपलब्ध आहेत.


या पार्श्वभूमीवर, राज्यातील 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एम.डी. आणि एम.एस. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये 29 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत एकूण 720 जागांची निव्वळ वाढ नोंदविण्यात आली आहे. महाविद्यालयनिहाय आकडेवारी पाहता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद येथे सर्वाधिक 77 जागांची वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथे 73, सातारा येथे 64, धुळे येथे 44 आणि अंबरनाथ येथे 40 जागा वाढल्या आहेत. कोल्हापूर आणि अंबाजोगाई येथे प्रत्येकी 39, लातूर येथे 38, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे 37, तर सोलापूर आणि जालना येथे प्रत्येकी 35 जागांची वाढ झाली आहे.



याशिवाय हिंगोली येथे 32, एल. टी. मार्ग, मुंबई येथे 30, अलिबाग येथे 27, बारामती येथे 22 आणि नांदेड येथे 19 जागा वाढल्या आहेत. तसेच बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि यवतमाळ येथे प्रत्येकी 17, नंदुरबार येथे 7, गोंदिया येथे 6, नाशिक येथे 3 आणि चंद्रपूर येथे 2 जागांची वाढ झाली आहे. भूलशास्त्र, शरीररचनाशास्त्र, जैवरसायनशास्त्र, समुदाय वैद्यक, न्यायवैद्यकशास्त्र, सर्वसाधारण औषधशास्त्र, बालरोगशास्त्र, विकृतिशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, मानसोपचारशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रेडिओडायग्नोसिस, सर्वसाधारण शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, नेत्ररोगशास्त्र आणि अस्थिरोगशास्त्र यांसारख्या विविध वैद्यकीय शाखांमध्ये ही प्रवेशक्षमता वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत शासकीय महाविद्यालयांची क्षमता बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

Comments
Add Comment

दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुकास्तरावर, स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

मुंबई: राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने एक

Ahilyanagar News: जिल्हा बँकेच्या राजकारणानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली सभापती राम शिंदे यांची भेट, चर्चेमागचं कारण काय?

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेले

महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी; नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात पटकावला राष्ट्रीय पुरस्कार!

नवी दिल्ली : नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने

इयत्ता १०वी आणि १२वीच्या सीबीएसई बोर्डच्या परीक्षा जाहीर; १६ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात

सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

अन्न- औषध प्रशासनाचा हेअर ऑईल कंपनीला दणका, खोटी जाहिरात केल्यामुळे नाशिकमध्ये धडक कारवाई

मुंबई: इन्स्टाग्राम, फेसबूक यांसारख्या सोशल मीडियावरून टक्कल असलेल्या व्यक्तींना केस उगवणे आणि केसांची वाढ

Pune Airport: पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, बँकॉकहून ड्रॅगन फ्रूटच्या पॅकेटमध्ये केली जात होती गांजाची तस्करी

पुणे: अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात एक मोठे यश मिळवत, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने