Friday, November 6, 2026

Nashik Citylink Bus : दिवाळीनिमित्त सिटीलिंक बस मार्गांत बदल, पर्यायी मार्ग जाणून घ्या

Nashik Citylink Bus : सिटीलिंक बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिटीलिंक बस तसेच मोठ्या वाहनांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलीस वाहने, अग्निशमन दल, शववाहिका, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक व आपत्कालीन सेवांच्या वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

५ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत या बदलांची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

सिटीलिंक बसेस, मोठ्या वाहनांना प्रवेश बंद

रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, अशोकस्तंभ, शालिमार, मेनरोड, दहीपूल, नेपाळी कॉर्नर आणि पंचवटी कारंजा परिसरात दिवाळी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, नेपाळी कॉर्नर आणि शालिमार या मार्गावरून सिटीलिंक बसेस व मोठ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग जाणून घ्या

दिंडोरी नाका ते सीबीएस : सिटीलिंक बसेस दिंडोरी नाका (निमाणी), पेठ फाटा, मखमलाबाद नाका, बायजाबाई छावणी (रामवाडी), अशोकस्तंभ, सिद्धेश्वर मंदिर, रामवाडी, मखमलाबाद नाका आणि पेठ फाटा मागनि वळविण्यात येत आहे.

सीबीएस ते पंचवटी : अशोकस्तंभ, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, बायजाबाई छावणी, मखमलाबाद नाका, पेठ फाटा आणि दिंडोरी नाका या मार्गाने बसेस जातील. नाशिकरोड, अंबड व सातपूर, दिंडोरी नाका येथून जाणाऱ्या बसेस काट्या मारुती सिग्नल, संतोष टी पॉइंट, कन्नमवार पूल, द्वारका सर्कल आणि मुंबई नाका सर्कलमार्गे इच्छित ठिकाणी जातील.

अत्यावश्यक सेवांना सूट

दरम्यान एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, यामध्ये पोलीस वाहने, अग्निशमन दल, शववाहिका, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक व आपत्कालीन सेवांच्या वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत. परिस्थितीनुसार पूर्वसूचना न देता मार्गात बदल करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवला आहे.

अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. नागरिक आणि सिटीलिंक चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >