Saturday, November 7, 2026

Faridabad Crime: धक्कादायक! पार्किंग आणि कुत्र्याच्या वादातून गोळीबार, माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू

पार्किंग आणि कुत्र्याच्या विष्ठेवरून सुरू असलेला वाद शुक्रवारी रात्री रक्तरंजित ठरला. शेजाऱ्याने केलेल्या गोळीबारात एका माजी वरिष्ठ कंपनी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सेक्टर २१-सी परिसरात ही घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव परमजित धनखड असे आहे. ते सिंगापूरमध्ये स्थायिक होते आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. ते यापूर्वी टेक महिंद्रा कंपनीच्या आशिया-पॅसिफिक विभागात प्रादेशिक व्यवसाय प्रमुख म्हणून काम करत होते. दिवाळी साजरी करण्यासाठी आणि २४ नोव्हेंबरला होणाऱ्या पुतण्याच्या लग्नासाठी ते ५ नोव्हेंबरला सिंगापूरहून भारतात आले होते. आरोपीचे नाव मोहन शर्मा असे आहे. तो त्याच्या कुटुंबासह इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होता, तर धनखड यांचे कुटुंब तळमजल्यावर राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाद कशावरून सुरू झाला?

दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पार्किंगवरून वाद सुरू होता. शर्मा यांचा मुलगा आपल्या कुत्र्याला पार्किंगच्या जागेतच शौचाला घेऊन जात असल्याचा धनखड कुटुंबाचा आक्षेप होता. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा वाद झाले होते. चार-पाच दिवसांपूर्वीही याच कारणावरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. शुक्रवारी रात्री पुन्हा गाडी पार्क करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर शर्माने धनखड यांना घराबाहेर बोलावले आणि आपल्या परवानाधारक पिस्तुलातून त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. शर्माने किमान १५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी नऊ गोळ्या धनखड यांना लागल्या.

गोळीबारानंतर शर्मा आपल्या कुटुंबासह पळून गेला होता. मात्र पोलिसांनी नंतर त्याला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून अनेक रिकाम्या काडतुसांचा साठा जप्त करण्यात आला. धनखड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बादशाह खान सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, ही घटना धक्कादायक असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >