
भारतीय हवाई दलाने अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. IAF ने पुन्हा एकदा आपली क्षमता जगाला दाखवून दिली आहे. IL-76MD या विमानाने लडाखमधील न्योमा एअरबेसवर यशस्वीरीत्या लँडिंग केले आहे. ज्याची उंची १३,६२९ फूट आहे. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार IL-76MD चे हे लँडिंग जगातील सर्वाधिक उंचीवर झालेले लँडिंग ठरले आहे. या ऐतिहासिक कामगिरीने फक्त विमानाची मजबुतीच सिद्ध केली नाही तर वैमानिकांच्या कौशल्य, अचूकता आणि व्यावसायिकतेचा नमुना देखील जगाला दाखवला आहे. न्योमा हवाई तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. जिथे जड विमान उतरवणे हे कठीण काम आहे. भारतीय हवाई दलाने लँड केलेले हे विमान गजराज नावानेदेखील ओळखले जाते. विरळ हवेमुळे इंजिनची शक्ती आणि उचल क्षमता कमी होते, ज्यामुळे लांब धावपट्टी आणि अत्यंत सावधगिरीची आवश्यकता असते. या यशस्वी लँडिंगने हे सिद्ध केले आहे की भारतीय हवाई दल अवघड उंच प्रदेशातही मोठी विमाने चालवू शकते.
न्योमा हवाई तळाचे सामरिक महत्त्व
न्योमा पूर्वी 'ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड' म्हणून ओळखले जात असते. त्याचे उद्घाटन १९६२ च्या युद्धादरम्यान झाले होते. त्यानंतर ते बऱ्याच काळासाठी बंद होते. २००९ मध्ये एएन -३२ विमानांच्या लँडिंगनंतर ते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. अलीकडच्या वर्षांत बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (BRO) सुमारे २.७ ते ३ किलोमीटर लांबीची पक्की धावपट्टी बांधून त्याचे आधुनिकीकरण केले आहे. २०२५ मध्ये हवाई दल प्रमुखांनी सी १३० जे विमान उतरवून याला औपचारिकपणे कार्यान्वित घोषित केले. आता हे जगातील सर्वात उंच लढाऊ विमानांसाठी सक्षम असलेल्या हवाई तळांपैकी एक मानले जाते.
View this post on Instagram
IL-76MD विमानाची भूमिका
IL-76MD जे हवाई दलात गजराज नावानेही ओळखले जाते, हे रशियन बनावटीचे चार इंजिन असलेले एक अवजड वाहतूक विमान आहे, ज्याची भारक्षमता ४० टन आहे. ते सैन्य, वाहने, तोफखाना आणि इतर लष्करी उपकरणे वाहून नेते. जास्त उंचीवर उतरणे अत्यंत आव्हानात्मक असते, कारण विरळ हवेमुळे इंजिनचा जोर कमी होतो. धावपट्टीची लांबी आणि हवामानाची परिस्थिती देखील यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारतीय हवाई दलाची ही कामगिरी केवळ एक विक्रम नसून भारताच्या सीमा सुरक्षा धोरणाचा एक भाग आहे. गलवान घटनेनंतर भारताने लडाखमध्ये रस्ते, बोगदे आणि हवाई तळ विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. न्योमासारख्या सुविधा चीनसोबत तणाव निर्माण झाल्यास त्वरित प्रतिसाद देण्यास मदत करतील. त्यामुळे लोकांची संपर्क व्यवस्थाही सुधारू शकते. भारत IL-76MD सारखी जुनी पण विश्वासार्ह विमाने उंच पर्वतीय प्रदेशात तैनात करून आपली सज्जता अधिक मजबूत करत आहे. ही घटना भारतीय संरक्षण दलांच्या आत्मविश्वासाची आणि तांत्रिक पराक्रमाची साक्ष आहे.






