
आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. बडोदा क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघातून हार्दिकला वगळण्यात आले असून, यामुळे त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. या संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारी बातमी समोर आली आहे. फ्रँचायझी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या ...
हार्दिक पांड्या शेवटचा 24 मे रोजी आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरला होता. तेव्हापासून तो सातत्याने दुखापतींशी संघर्ष करत आहे. आयपीएलदरम्यान त्याला प्रथम पाठीच्या स्नायूंच्या समस्येने आणि नंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त केले होते. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली होती, परंतु पोटरीच्या दुखापतीमुळे त्याला ऐनवेळी मुकावे लागले. त्यानंतरचा बराचसा काळ त्याने बंगळूरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅबिलिटेशनमध्ये घालवला आहे.
पुढील वर्षी आफ्रिकेत होणारा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ व्यवस्थापन कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, पूर्ण तंदुरुस्तीशिवाय हार्दिक आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान दिले जाणार नाही. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, असे व्यवस्थापनाचे स्पष्ट धोरण आहे. दरम्यान, बडोद्याच्या संघात कृणाल पांड्याशिवाय जितेश शर्मा, दीपक हुडा, शिवालिक शर्मा आणि रसिक दार यांसारख्या अनुभवी व प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. बडोदा संघ 14 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे चंदीगडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची धडाक्यात सुरुवात करणार आहे. आता हार्दिकच्या अनुपस्थितीत बडोद्याचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





