Monday, November 9, 2026

Solapur Crime : हत्येचे गूढ अवघ्या 2 तासांत उलगडले; ब्लँकेटमध्ये गुंडाळून टाकला होता विवाहितेचा मृतदेह; नेमकं घडलं काय?

न्यायालयात सुरू असलेला बलात्काराचा खटला मागे घेण्यासाठी आरोपी कीर्तीवर दबाव टाकत होता. त्यास नकार दिल्याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

Crime News: उजनी धरणाच्या पाण्यात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत 26 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कीर्ती रामचंद्र डाबरे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भगवान महादेव कांबळे (वय 51) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात सुरू असलेला बलात्काराचा खटला मागे घेण्यासाठी आरोपी कीर्तीवर दबाव टाकत होता. त्यास नकार दिल्याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

मुलाला मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान कांबळे याने कीर्तीच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी कीर्तीने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू होती.

जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपीने खटला मागे घेण्यासाठी कीर्तीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. खटला मागे घेतला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तो देत असल्याचे कीर्तीने आईला सांगितले होते.

 

दोन महिन्यांपूर्वीही केली होती मारहाण

कीर्तीच्या आईने दिलेल्या जबाबानुसार, 19 ऑगस्ट 2026 रोजी कीर्तीने इंदापूर पोलीस ठाण्यात धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच, दोन महिन्यांपूर्वी ती टेंभुर्णी येथे गेली असताना संशयावरून आरोपीने तिला मारहाण केली होती.

आईलाही फोन करून दिली होती धमकी

3 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोपीने कीर्तीच्या आईला फोन केला होता. ‘तुमची मुलगी माझ्या घराजवळ फिरत आहे. तिला समजावून सांगा, अन्यथा तिचे काय करायचे ते मी बघतो,’ अशी धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर आरोपीने ओढणीने गळा आवळून कीर्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून बिटरगाव (वांगी) परिसरातील उजनी धरणाच्या पाण्यात फेकून दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

दोन तासांत आरोपीला अटक

5 नोव्हेंबर रोजी उजनी धरणाच्या पाण्यात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी तपास करून 7 नोव्हेंबर रोजी मृत महिलेची ओळख पटवली.

यानंतर मृत महिलेची आई रुपाली सुखदेव चांदणे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपी भगवान कांबळे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >