
छत्रपती संभाजीनगर येथे एका ज्येष्ठ व्यक्तीची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. सिडको एन ४ येथील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीची बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे जास्त परताव्याचे आमिष दाखवून लुटारूंनी १.१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३(५) (सामूहिक उद्देश), ३१८(४) (फसवणूक) आणि ३१९(२) (बनावट ओळख वापरून फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(c) आणि ६६(d) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, ७२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती हे आपल्या कष्टाच्या कमाईची योग्य गुंतवणूक करण्याचा विचार करत होते. याच दरम्यान त्यांना सोशल मीडियावर एक ट्रेडिंग संबंधातील जाहिरात दिसली. याबद्दल जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता दिव्या अय्यर नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपी महिलेने आधी ज्येष्ठाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करायला सांगितले. शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी सिग्नल अॅपवरून टिप्स दिल्या जात होत्या. त्या सूचनांनुसार फिर्यादी यांनी अॅपवर व्यवहार सुरू केला. अॅपवर काही दिवसांतच मूळ गुंतवणूक आणि नफा मिळून ५ कोटी ५२ लाख रुपये शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले. यात ४ कोटी ५० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे दिसत होते. ही आकडेवारी पाहून फिर्यादींचा योजनेवर पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर भामट्यांनी त्यांना आणखी शेअर्स खरेदी करण्यास प्रवृत्त केले.
तिरुपल्ली : दिवाळीच्या सणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असले, तरी नियम मोडून फोडलेल्या फटाक्यांमुळे तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली शहरातील हवेची ...
फिर्यादी यांनी ३० सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२६ या काळात अदालत रोडवरील अॅक्सिस बँक खात्यातून आरटीजीएस व एनईएफटीद्वारे ८ वेगवेगळ्या अनोळखी खात्यांवर १ कोटी ७ लाख ४५ हजार रुपये पाठवले. ही रक्कम सेंट्रल बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि कॅनरा बँकेच्या विविध शाखांमधील खात्यांमध्ये जमा झाली. नफा काढायला गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र मुंडे म्हणाले, 'एका अज्ञात महिलेसह आणि एका विशिष्ट मोबाईल नंबरचा वापर करणाऱ्या व्यक्तीसह आरोपींनी त्याला मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून त्याचा विश्वास जिंकला आणि आरटीजीएसद्वारे हप्त्यांमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास भाग पाडले.' अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 'चोरलेले पैसे बँकिंग नेटवर्कमधून बाहेर पडण्यापूर्वी ते रोखण्यासाठी ठरवून दिलेल्या बहुटप्प्यांच्या प्रक्रियेचे पालन केले जात आहे.' असे मुंडे म्हणाले. तसेच संशयितांचा ठावठिकाणा शोधला जात असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.





