Wednesday, November 11, 2026

Kurla Crime: कुर्ल्यात दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरार! तीन गोळ्या झाडून 40 वर्षीय व्यक्तीची हत्या

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात दिवसाढवळ्या गोळीबाराची थरारक घटना! जुन्या वैमनस्यातून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी 40 वर्षीय विनोद पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात बुधवारी दुपारी दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात विनोद मल्लाप्पा पवार (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे. दुपारी 12:40 च्या सुमारास माकडवाला कंपाउंडजवळ अज्ञात हल्लेखोरांनी जुन्या वैमनस्यातून पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदूक जप्त केली असून, फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी 12:40 च्या सुमारास व्हीबी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माकडवाला कंपाऊंडमध्ये घडली. कुर्ल्यातील हलाव पुलाजवळ दुचाकीवरून येत आरोपींनी विनोद पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच व्हीबी नगर पोलीस ठाण्यातील एक पथक आणि इतर पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस या हल्ल्याचा संबंध एका जुन्या वैमनस्याशी जोडत आहेत. या हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांची संख्या, वापरलेल्या शस्त्राचा प्रकार आणि आरोपींनी झाडलेल्या गोळ्यांची संख्या तपासानंतर समोर येईल.

पोलीस स्थानिक रहिवाशांची चौकशी करत आहेत. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जाईल. पोलीस पथके सध्या संशयितांना ओळखण्याचे आणि शोधण्याचे काम करत आहेत. या घटनेमागील खरा हेतू आणि हल्लेखोरांची भूमिका हे तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होईल. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे कुर्ला परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >