
मुंबई : मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात सुधारणा करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यानुसार या दोन्ही कँटीनमध्ये शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ यांसारख्या प्रादेशिक खाद्यपदार्थांसह बीट कबाब, दलिया उपमा, मंचाव सूप, उकडलेला मका आणि हराभरा कबाब अशा सुमारे ५४ नव्या पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. तेलकट आणि आरोग्यास अपायकारक पदार्थांवरील अवलंबित्व कमी करून कर्मचाऱ्यांना चव आणि पोषण यांचा समतोल साधणारे पर्याय उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनमध्ये स्वच्छता तसेच खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्याचा मुद्दा अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीनंतर आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर ऐरणीवर आला होता. त्यानंतर कँटीनमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि संतुलित आहाराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेऊन कँटीनमध्ये पौष्टिक पदार्थ उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
Mumbai Local : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना दरवाजात ...
त्यानुसार नव्या मेन्यूमध्ये बीट कटलेट, बीट कबाब, दलिया उपमा, उकडलेला मका, झटका भेल, पुणेरी मिसळ, हराभरा कबाब आणि मंचाव सूप यांसारख्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांनाही या मेन्यूमध्ये स्थान देण्यात आले आहे. तळलेले आणि अधिक तेलकट पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवून आरोग्याला पूरक पर्याय वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
दर किती असणार? नव्या खाद्यपदार्थांची यादी आणि त्यांचे दर निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सध्या बाजारातील तेल, तूप आणि अन्य कच्च्या मालाच्या किमतींच्या आधारे दर ठरविण्यात येत आहेत. मात्र, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यास कँटीनमधील पदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या मेन्यूमुळे कर्मचाऱ्यांना अधिक वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध होणार असले, तरी त्यांच्या किमतीही महत्त्वाच्या ठरणार आहेत.





