Wednesday, November 11, 2026

IPL ची 'मिस्ट्री गर्ल' काव्या मारन अडकणार विवाहबंधनात! संगीतकार अनिरुद्धसोबत ग्रीसमध्ये साखरपुडा

अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांचा १० नोव्हेंबर रोजी तमिळ परंपरेनुसार ग्रीसमध्ये साखरपुडा पार पडला. त्यानंतर आज त्यांचा विवाह होणार असल्याचे समजते.

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह-मालक काव्या मारन यांचा १० नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये साखरपुडा पार पडला, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. तमिळ परंपरेनुसार हा साखरपुडा सोहळा पार पडला. त्यानंतर आज (११ नोव्हेंबर) त्यांचा विवाह होणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी होणाऱ्या पारंपरिक 'निचियाथार्थम' या औपचारिक तमिळ साखरपुड्याच्या विधीदरम्यान या जोडप्याने अंगठ्यांची देवाणघेवाण केली.

हा सोहळा ग्रीसमध्ये एका छोटेखानी डेस्टिनेशन वेडिंगच्या स्वरूपात आयोजित केला जात असून, त्यात जवळचे कुटुंबीय आणि निवडक पाहुणे उपस्थित राहणार आहेत.मारन कुटुंब स्वतः लग्नाच्या सोहळ्याचे आयोजन करत आहे. लग्नाचे नेमके ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु एनडीटीव्हीने स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन सुरू असलेल्या चर्चांच्या विपरीत, हे लग्न सँटोरिनीमध्ये होत नाहीये. चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती या उत्सवासाठी ग्रीसला गेल्या आहेत. सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांचे कुटुंब, तसेच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे ग्रीसला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर दिसून आले.

काव्या ही 'सन ग्रुप'चे अध्यक्ष कलानिधी मारन यांची कन्या असून, ती 'सन टीव्ही नेटवर्क'मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहे. ती आयपीएल फ्रँचायझी 'सनरायझर्स हैदराबाद'ची सीईओ (CEO) देखील आहे. अनिरुद्ध हा तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांपैकी एक असून, त्याने '३', 'कथी', 'विक्रम', 'जेलर', 'लिओ' आणि 'कुली' यांसारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.

या जोडप्याचा विवाहसोहळा (रिसेप्शन) २१ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. काव्याच्या पालकांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिल्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या कार्यालयाकडून या तारखेला दुजोरा देण्यात आला होता. तसेच, या कुटुंबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनाही निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. अनिरुद्ध किंवा काव्या यांपैकी कोणीही अद्याप सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याची किंवा लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >