Tuesday, November 10, 2026

Gokul Milk Union : गोकुळच्या संदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या बाजूने!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका; राहुल गांधींवरही टीका

मुंबई : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे महायुतीने सत्ता मिळवल्यानंतर या निवडणुकीवरून सुरू झालेल्या राजकीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ‘गोकुळच्या संदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या बाजूने आहे. संस्थेत निर्माण झालेला वैधानिक पेच सोडवण्यासाठीच शासननियुक्त संचालकांचा निर्णय घेण्यात आला,’ असे ते म्हणाले. तसेच गोकुळच्या निवडणुकीला राजकीय रंग देण्यात आला असून काँग्रेस नेते राहुल गांधीही त्यात सहभागी झाल्याची टीका त्यांनी केली.

गोकुळच्या संचालक मंडळात एका गटाचे १३, तर दुसऱ्या गटाचे १२ सदस्य असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेले बहुमत आणि कोरम यांचा प्रश्न निर्माण झाला होता. एका सदस्याच्या अनुपस्थितीत अध्यक्षपदाची निवड होऊ शकत नव्हती. त्यामुळे शासननियुक्त संचालकांचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सरकारला गोकुळमध्ये हस्तक्षेप करायचा असता, तर निवडणुकीनंतर लगेचच संचालक नियुक्त करता आले असते. मात्र, कोरम पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयातही सरकारने अध्यादेशात दोष नसल्याची भूमिका मांडली होती. चार शासननियुक्त संचालकांची मते स्वतंत्रपणे ठेवून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला असता, तर शासननियुक्त संचालक पाठवण्याची वेळ आली नसती, असेही फडणवीस म्हणाले. सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या व्यक्तींचीच गोकुळमध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील एखादी व्यक्ती स्त्रीरोगतज्ज्ञ असेल, तर त्यात गैर काय, असा सवाल करत त्यांनी या नियुक्त्यांवरून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या आंदोलनावरही फडणवीस यांनी निशाणा साधला. काँग्रेसकडून देशातील घटनात्मक संस्थांविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक यांसारख्या संस्थांवर दबाव असल्याचे सांगून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राहुल गांधी यांना देशात नेपाळसारखी व्यवस्था निर्माण करायची आहे. विरोधक संसदेत चर्चा करण्याऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याने त्याला उत्तर देण्यासाठी भाजपही रस्त्यावर उतरल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विरोधकांच्या या भूमिकेला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >