
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोडलगाव येथे मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घराजवळ खेळत असताना एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच कुटुंबातील आठ बालकांना विषबाधा झाली. या घटनेत चार वर्षीय निर्मला वळवी या चिमुरडीचा मृत्यू झाला असून, अन्य सात बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
खेळता खेळता खाल्ल्या एरंडीच्या बिया
मिळालेल्या माहितीनुसार, मोडलगाव येथील वळवी कुटुंबातील आठ बालके घराजवळ खेळत होती. मुलांचे आई-वडील रोजगाराच्या शोधात अन्य जिल्ह्यात गेले असून, घरातील वयोवृद्ध व्यक्ती गुरे चारण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. याचवेळी शेताच्या बांधावर असलेल्या एरंडीच्या झाडाच्या बिया बालकांनी खाल्ल्या. काही वेळाने मुलांना त्रास जाणवू लागला. काही बालकांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला, तर काही मुले एरंडीच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत पडली होती. घरातील मोठी माणसे बाहेर असल्याने सुरुवातीला या प्रकाराची कोणालाही माहिती मिळाली नाही.
सात बालकांवर रुग्णालयात उपचार
गुरे चारून घरी परतलेल्या कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात येताच एकच धावपळ उडाली. सर्व बालकांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार वर्षीय निर्मला वळवी हिचा मृत्यू झाला. या घटनेत पाच मुलगे आणि तीन मुलींना विषबाधा झाली आहे. उर्वरित सात बालकांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असतानाच त्र्यंबकेश्वर परिसरातील भूगर्भीय ...
स्थलांतरामुळे बालकांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेने दुर्गम आदिवासी भागातील बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रोजगारासाठी आई-वडिलांना गाव सोडून अन्य जिल्ह्यांत जावे लागत असल्याने लहान मुलांच्या देखभालीची जबाबदारी अनेकदा घरातील वयोवृद्ध व्यक्तींवर येते. अशा परिस्थितीत लहान मुलांकडून अनवधानाने विषारी बिया किंवा वनस्पती खाल्ल्या जाण्याचा धोका निर्माण होतो. या दुर्दैवी घटनेमुळे मोडलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बालकांच्या सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
विषबाधा झालेल्या बालकांची नावे
१. सुंदर कुवरसिंग वळवी (वय ३ वर्षे)
२. विवेक पिंट्या वळवी (वय ४ वर्षे)
३. जिंता सुभाष वळवी (वय ३.५ वर्षे)
४. विकी धनवरसिंग पाडवी (वय ३ वर्षे)
५. किरण सुभाष वळवी (वय २.५ वर्षे)
६. मनोज बिज्या वळवी (वय ५ वर्षे)
७. पंकिता इसऱ्या पवार (वय ४ वर्षे)






