नाशिक : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण परिसरात भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. सुमारे पाच एकर क्षेत्रात हे स्मारक साकारले जाणार असून, याठिकाणी २१ फूट उंचीचा पुतळाही उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी चार कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ओझरखेड धरण परिसरात पाच एकरांवर स्मारकाची उभारणी
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळ भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या परिसरात पाच एकर जागेत विविध विकासकामे केली जाणार आहेत. त्यामध्ये २१ फूट उंचीचा भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्याबरोबरच वृक्षारोपण आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा विकास केला जाणार आहे. या कामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्मारकाच्या उभारणीमुळे ओझरखेड धरण परिसराला नवी ओळख मिळण्यासोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही हा भाग विकसित होण्याची अपेक्षा आहे.
भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष देशासाठी प्रेरणादायी
भगवान बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे नेते नव्हते, तर त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष करणारे महान स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही देशाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. जल, जंगल आणि जमीन या आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आदिवासी समाजाला एकत्र आणून त्यांनी संघर्ष केला. त्यांचे बलिदान, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाला वेग आला आहे. लाखो ...
जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यात जनजातीय गौरव दिन साजरा करण्यासोबतच जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहातून आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः दुर्गम भागातील पाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसाठी मदत, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. घरकुल, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाशी संबंधित योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
ओझरखेडसह सुरगाण्यातील पर्यटन विकासालाही चालना
जिल्हा विकास आराखड्यांतर्गत उपलब्ध झालेल्या प्रोत्साहनात्मक निधीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्याचे नियोजन आहे. ओझरखेड धरण परिसरातील स्मारक प्रकल्पामुळे स्थानिक पर्यटन वाढण्यासोबतच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय राज्य शासनाच्या ॲस्ट्रो टुरिझम धोरणांतर्गत सुरगाणा तालुक्यातील उधमाळ या ठिकाणाचाही विकास करण्यात येत आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, त्यांचा संघर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प धार्मिक किंवा पर्यटनस्थळापुरता मर्यादित न राहता आदिवासी अस्मिता आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक ठरणार आहे.