मुंबई : "निसर्गावर माणसाचे स्वामित्व नसून, माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. जैवविविधता आणि पर्यावरणाचे संतुलन राखले गेले, तरच मानवाचे जीवन सुखी होऊ शकते. त्यासाठी माणसाने स्वतःवर काही निर्बंध घालून घेण्याची गरज आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामटेक येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे लोकनेते दिवंगत दत्ता मेघे यांच्या स्मारकाचे अनावरण तसेच नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरसंघचालक भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.
आपण पूर्वी निसर्गाचे स्वामी असल्याच्या भावनेतून विचार करीत होतो. मात्र, माणूस हा निसर्गासह संपूर्ण विश्वाचा एक घटक आहे आणि त्याचे अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे. पर्यावरण आणि जैवविविधता निरोगी राहिली, तरच मनुष्याचे आरोग्य आणि जीवनमान चांगले राहू शकते. त्यामुळे सुखी होण्यासाठी माणसाने स्वतःच्या वर्तनावर मर्यादा घालणे आवश्यक आहे, असे भागवत म्हणाले.
पशुवैद्यकीय शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात बोलताना भागवत यांनी ‘वन हेल्थ’ संकल्पनेचा उल्लेख केला. पशूंचे आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम केवळ पशुपालकांच्या उत्पन्नावर होत नाही, तर पशूंमधील आजार माणसांमध्येही पसरू शकतात. पर्यावरणाचे आरोग्य आणि मानवी आरोग्य यांचा परस्पर संबंध असल्याचे जगाला आता उमगू लागले आहे. मात्र, भारतीय परंपरेत ही जाणीव पूर्वापार असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण पशुवैद्यकीय डॉक्टर असल्याची आठवण लोक अधूनमधून करून देतात, असे सांगत या क्षेत्रातील आधुनिक सुविधांचेही त्यांनी स्वागत केले.
भारतीय जीवनपद्धती आणि परंपरेतील ज्ञानाकडे लक्ष वेधताना भागवत यांनी वसुबारस, गोवर्धन पूजा आणि गाईच्या शेणाच्या उपयोगाचा दाखला दिला. पूर्वजांनी अनुभवातून आणि अनेक अडचणींवर मात करून जीवनपद्धती विकसित केली. त्यावेळी जगाने या परंपरांची हेटाळणी केली; मात्र आता त्यातील अनेक गोष्टींचे महत्त्व जगाला पटू लागले आहे. भारतीय परंपरेतील ज्ञानाचा अभ्यास करून त्याच्या आधारे जगाला विकासाचा नवा मार्ग दाखवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
Mumbai Bomb Threat: मुंबईसह पुण्यातदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. मुंबईमध्ये महापौरांच्या कार्यालयाचा उल्लेख करण्यात आला असून, विमानतळ, ...
भारतीय गोवंशाच्या जतनाकडे दुर्लक्ष
- देशी गोवंशाच्या संवर्धनाबाबतही त्यांनी भाष्य केले. भारतातील गायींच्या क्षमतेत सुधारणा करण्याची संधी असतानाही आपण त्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही. उलट जर्सी आणि परदेशी गायी आणण्यावर भर दिला. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी भारतातील गायी जगात नेऊन त्यांच्या दुधाच्या क्षमतेत सुधारणा करण्यात आली. परदेशात देशी गोवंशाच्या गुणधर्मांचा उपयोग करून सुधारित जाती विकसित करण्यात आल्या; मात्र आपण आपल्या गोवंशाकडे अपेक्षित लक्ष दिले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
- आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ज्ञान आणि साधनसंपत्तीच्या आधारे विकास केल्यास इतरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते. स्वावलंबनामुळे माणूस स्वतंत्र होतो. मात्र, आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांची सेवा करण्याची जबाबदारीही त्यातून निर्माण होते. जगातील इतर देशही आपलेच आहेत, या भावनेतून प्रत्येक राष्ट्राने स्वतःच्या विकासाबरोबरच जगाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. भारतीय शास्त्र आणि परंपरेत उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वावलंबी होण्याचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.