
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराच्या दिशेने बाटल्या फेकल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
घराच्या दिशेने बाटल्या फेकल्याचा आरोप
संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री काही व्यक्तींनी त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावाही त्यांनी केला. सुरुवातीला त्यांची गाडी पडली होती. त्यानंतर ते पुन्हा परत येऊन घराच्या गेटजवळ आले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांशी वाद घातल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
कार्यकर्ता किरकोळ जखमी
या घटनेत त्यांचा एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हल्लेखोरांकडे शस्त्र असते, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद
या घटनेबाबत संजय शिरसाट सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तिघांची चौकशी सुरू असून, हल्ल्याचा नेमका उद्देश आणि घटनाक्रम तपासला जात आहे.






