Friday, November 13, 2026

प्रदूषणमुक्त मुंबईच्या दिशेने मोठं पाऊल! BEST च्या ताफ्यात 1500 ई- बस दाखल होणार

प्रदुषणमुक्त मुंबईच्या दिशेने बेस्टकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. BEST च्या ताफ्यात लवकरच 1500 ई- बस दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात मिडी बसेसचा समावेश करण्यात येणार आहेत.

मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाने गुरुवारी बेस्टच्या ताफ्यामध्ये 1500 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या घडामोडीमुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची आणि ती अधिक पर्यावरण पूरक बनण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 9 मीटर मिडी बसेसचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. हा करार मुंबईतील वेगवेगळ्या बंद पडलेल्या 125 मार्गांवरील बसेस पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने बेस्टच्या ताफ्यामध्ये नवीन इलेक्ट्रिक बसेस समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

भाडेपट्टीच्या आधारावर मे. मुंबई विद्युत वाहन ऑपरेशन प्रा. लि. आणि मे. साई ग्रीन ईव्हीएम प्रा. लि. या दोन ऑपरेटर्सना बस सांभाळण्याचे कंत्राट देण्यात आले आहेत. कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने कंत्राट देण्याचे जाहीर केलेल होते. त्या आधारावर ही स्पर्धात्मक बोली प्रक्रिया पार पडल्याची माहिती 'द टाइम्स ऑफ इंडिया' ने दिलेली आहे.

बसेस एका खाजगी कंत्राटदाराकडून खरेदी केल्या जातात, त्या कंत्राटदाराकडून बससाठी चालकही पुरवला जातो, देखभाल, इंधन आणि विम्याचा खर्चही उचलतो, या प्रक्रियेला वेट-लीज करार म्हटले जाते. वेट लीज करारावर बेस्टच्या बसेस चालवल्या जाणार आहेत. बेस्टकडून कंडक्टरची नेमणूक, तिकीट विक्रीतून महसूल आणि आपल्या डेपोंमध्ये बसेससाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे, असे वेगवेगळे काम केले जातात. अशा व्यवस्थेमुळे, बेस्टला बसेस खरेदी करण्याची किंवा त्यांची देखभाल करण्याची गरज भासत नाही.

विक्रोळी, भांडुप आणि कांजूरमार्ग यांसारख्या पूर्व उपनगरांमधील सेवांना २८ आसनी बसेसमुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे, कारण यापैकी काही भागांमध्ये अरुंद रस्ते आणि तीव्र चढावांमुळे मोठ्या 12 मीटर बसेसना अडचणी येतात. या विस्तारामुळे निवासी क्षेत्रे, मेट्रो स्थानके आणि रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. टप्प्याटप्प्याने दाखल होणाऱ्या या अतिरिक्त बसेसमुळे बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील बसची संख्या 400 वरून सुमारे 525 पर्यंत वाढेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >