
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा अवघ्या 89 धावांत डाव आटोपला आणि तब्बल 244 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर फलंदाजांच्या कामगिरीवर चांगलाच संतापला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना शून्यावर बाद केले. मात्र, या चेंडूंना 'खेळणे अशक्य होते' असे म्हणण्यास गंभीरने स्पष्ट नकार दिला. फलंदाजांनी योग्य पद्धतीने खेळण्यात अपयश आल्याचे त्याने सांगितले.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 333 धावांचे लक्ष्य उभे केले होते. भारतीय फलंदाजांकडून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची अपेक्षा होती. मात्र, मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात भारताला तीन मोठे धक्के दिले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणताही चेंडू खेळणे अशक्य नसते. आम्हाला पहिली 10 षटके सांभाळून खेळण्याची गरज होती. मॅट हेन्रीने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली; मात्र फलंदाजांनी त्याचा सामना करायला हवा होता.” संघाचा डाव 90 च्या आसपास धावसंख्येवर संपुष्टात येणे ही निश्चितच चिंतेची बाब असल्याचेही त्याने स्पष्ट केले. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीनेही अशा परिस्थिती महत्त्वाच्या असल्याचे गंभीरने नमूद केले.
[caption id="attachment_1074798" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडचा एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 244 धावांनी मिळवलेला विजय हा ...
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची आठवण करून देताना गंभीरने फलंदाजीतील सातत्याच्या अभावावर बोट ठेवले. त्या सामन्यात भारताने डीएलएस पद्धतीने विजय मिळवला होता; मात्र 111 धावांवर सात फलंदाज बाद झाले होते. “मागील सामन्यातही आम्ही 111 धावांवर सात गडी गमावले होते. ही चिंतेची बाब आहे. खेळाडूंनी मानसिक आणि कौशल्याच्या पातळीवर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. अशा खेळपट्ट्यांवर 35 ते 40 धावा बिनबाद करणेही योग्य ठरू शकते. आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत आणि शेवटच्या सामन्यात ते परिस्थितीशी जुळवून घेतील, अशी आशा आहे,” असे गंभीर म्हणाला.
न्यूझीलंडने 333 धावांचा डोंगर उभारला असला, तरी गंभीरने गोलंदाजी विभागावर फारशी टीका केली नाही. उलट, क्षेत्ररक्षणातील चुका आणि झेल सोडल्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, “आकिब नबी दुर्दैवी ठरला. विल यंगचा झेल घेतला असता, तर सामन्याचे चित्र वेगळे असू शकले असते. मात्र, आता मागे वळून पाहण्यात अर्थ नाही. आम्ही झेल सोडले आणि त्याची किंमत मोजावी लागली. आमच्या गोलंदाजी विभागाचा सर्वांनी अभिमान बाळगायला हवा.”
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वापरलेल्या वॉबल सीम चेंडूंविषयी विचारले असता गंभीरने तांत्रिक तपशीलात जाणे टाळले. त्याच्या मते, चेंडू फारसा वळत नव्हता; फलंदाजांनी त्यातील हालचालीचा योग्य सामना करणे अपेक्षित होते. “सीमपेक्षा गोलंदाजांनी टाकलेला चेंडूचा टप्पा आणि लांबी यामुळे आम्हाला अडचणी आल्या. फलंदाज क्रीजमध्येच अडकून पडले,” असे गंभीरने स्पष्ट केले. आता मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात आणि या पराभवातून काय धडा घेतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





