Friday, November 13, 2026

Telangana ACB Raid : अरे बापरे! सरकारी बाबूकडे थेट 7 कोटींचा व्हिला अन् 25 एकर जमीन; धाड पडताच फुटला घाम

या कारवाईत 7 कोटी रुपये किमतीचा व्हिला, 25 एकर शेतजमीन, सुमारे 50 तोळे सोने, फ्लॅट्स आणि अनेक भूखंडांची माहिती मिळाली आहे.

तेलंगणा: सरकारी नोकरीत असलेल्या अभियंत्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) छापा टाकल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. तेलंगणातील सिंचन विभागात कार्यरत असलेल्या उपकार्यकारी अभियंता राघिरी सत्यनारायण यांच्या मालमत्तांची एसीबीकडून तपासणी करण्यात आली. या कारवाईत 7 कोटी रुपये किमतीचा व्हिला, 25 एकर शेतजमीन, सुमारे 50 तोळे सोने, फ्लॅट्स आणि अनेक भूखंडांची माहिती मिळाली आहे.

10 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी

बेहिशेबी मालमत्तेच्या संशयावरून एसीबीने सत्यनारायण यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम राबवली. यामध्ये त्यांचे मूळ गाव शापूर, वनपर्थी, हैदराबाद तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. या कारवाईत मालमत्तांची कागदपत्रे, जमीन, वाहने आणि गुंतवणुकीशी संबंधित माहिती गोळा करण्यात आली.

7 कोटींचा व्हिला आणि पत्नीच्या नावावर 9 भूखंड

एसीबीच्या तपासात हैदराबादमधील कुकटपल्ली येथे सुमारे 7 कोटी रुपये बाजारमूल्य असलेला व्हिला आढळल्याची माहिती आहे. याशिवाय वनपर्थी येथे 25 एकर शेतजमीन आणि फार्महाऊसही असल्याचे समोर आले आहे.

सत्यनारायण यांच्या पत्नीच्या नावावर 9 मोकळे भूखंड असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच हैदराबादमधील कर्मणघाट येथील 3-BHK आणि नागोलेमधील रॉकटाऊन परिसरातील 2-BHK फ्लॅटचीही चौकशी सुरू आहे.

50 तोळे सोने आणि 20 लाखांची गुंतवणूक

छाप्यादरम्यान सुमारे 50 तोळे सोन्याची माहिती समोर आली. कुटुंबाकडे 3 ते 4 चारचाकी वाहने आणि एक दुचाकी असल्याचेही तपासात आढळले. याशिवाय म्युच्युअल फंड आणि चिट फंडमध्ये अंदाजे 20 लाख रुपयांची गुंतवणूक असल्याची माहिती मिळाली आहे. विमा पॉलिसींची माहितीही तपासली जात आहे. मात्र, झडतीदरम्यान कोणतेही बँक लॉकर आढळले नसल्याचे सांगण्यात आले.

2005 मध्ये सरकारी सेवेत रुजू

राघिरी सत्यनारायण 2005 मध्ये सहायक अभियंता म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले होते. सध्या ते सिंचन विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नीही विद्युत विभागात सहायक अभियंता असून ट्रान्सकोमध्ये काम करतात.

एसीबीकडून उत्पन्न आणि मालमत्तेच्या स्रोतांची तपासणी

सत्यनारायण आणि त्यांच्या कुटुंबाचे अधिकृत उत्पन्न, पगार, गुंतवणूक तसेच मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत एसीबी तपासत आहे. मालमत्ता कधी खरेदी करण्यात आली आणि त्यासाठी निधी कुठून आला, याचीही कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली जाणार आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, उघड झालेल्या मालमत्तांपैकी किती मालमत्ता ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांशी विसंगत आहेत, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >