Friday, November 13, 2026

Nashik : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी ! मतदार यादीत नाव नाही ? चिंता करू नका, निवडणूक आयोगाने दिली पुन्हा संधी

Nashik Voter List SIR 2026 : नाशिकच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना पुन्हा संधी. गणना प्रपत्र, ASDD यादी, ऑनलाइन अर्ज आणि फॉर्म-6 बाबत जाणून घ्या.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व 15 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेदरम्यान काही मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदणी (ASDD) या कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत.

मात्र, अशा मतदारांना आता अंतिम मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने आणखी एक संधी दिली आहे. संबंधित मतदारांनी आवश्यक गणना प्रपत्र भरून सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

मतदार यादीतून नाव वगळले गेलेल्यांना पुन्हा संधी

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान निवडणूक यंत्रणेकडून घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वाटप आणि संकलन करण्यात आले होते. या प्रक्रियेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार मतदार म्हणून नोंद झालेल्या (ASDD) व्यक्तींची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. आता अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणना प्रपत्र भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरता येणार अर्ज

संबंधित मतदारांची पूर्वीची माहिती असलेले गणना प्रपत्र ECINet प्रणालीच्या माध्यमातून मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे प्रपत्र मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष संपर्कासह व्हॉट्सॲप, ई-मेल आणि एसएमएसचा वापर केला जाणार आहे. याशिवाय मतदारांना निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ECINet प्रणालीवर आपला EPIC क्रमांक (मतदार ओळखपत्र क्रमांक) नोंदवून गणना प्रपत्र डाउनलोड करता येणार आहे. हे प्रपत्र भरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करता येईल.

BLO मार्फत मतदारांशी साधला जाणार संपर्क

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) संबंधित राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या समन्वयाने मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. याशिवाय मतदारांचे शेजारी, नातेवाईक, स्थानिक रहिवासी आणि रहिवासी कल्याणकारी संस्थांच्या माध्यमातूनही संपर्क साधला जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे मतदारांना गणना प्रपत्र कसे भरायचे आणि अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणती कार्यवाही करायची, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या प्रक्रियेत मूळ निवासस्थानावरून स्थलांतरित न झालेल्या मतदारांना गणना प्रपत्रासोबत जोडपत्र-ब सादर करण्याची गरज नाही. मात्र, मूळ पत्त्यावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांनी जोडपत्र-बमध्ये आपला सध्याचा नवीन पत्ता आणि संबंधित विधानसभा मतदारसंघाची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर हे प्रपत्र सध्याच्या निवासस्थानाशी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

ASDD मतदारांची यादी कुठे पाहाल ?

ASDD प्रवर्गात समाविष्ट झालेल्या मतदारांची यादी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या आणि नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना खालील संकेतस्थळांवर जाऊन आपले नाव तपासता येईल.

महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय: https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय: https://nashik.gov.in

त्यामुळे प्रारूप मतदार यादीत आपले नाव नसलेल्या संबंधित मतदारांनी या संकेतस्थळांवर यादी तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

फॉर्म-6 भरला असेल तर पुन्हा गणना प्रपत्राची गरज नाही

दरम्यान, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या मतदारांनी नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-6 भरून अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव वगळले गेले असल्यास निवडणूक आयोगाने दिलेल्या या संधीचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >