ACB trap Maharashtra news : समाजकल्याण निरीक्षक लाच घेताना जेरबंद; संत रोहिदास विकास केंद्राच्या प्रलंबित बिलासाठी मागितली ७५ हजारांची लाच
या मागणीबाबत ठेकेदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, अहिल्यानगर येथे लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान संदीप फुंदे यांनी पंचांसमक्ष ७५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
November 13, 2026 06:29 PM
ACB trap Maharashtra news
AI genrated image
अहिल्यानगर : सरकारी काम पूर्ण करूनही त्याचे प्रलंबित बिल मिळवण्यासाठी ठेकेदाराला लाच द्यावी लागत असल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. संत रोहिदास विकास केंद्राच्या बांधकामाचे प्रलंबित २४ लाख ८० हजार ९८४ रुपयांचे दायित्व मिळवून देण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव सादर करणे आणि निधी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याच्या मोबदल्यात ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या समाजकल्याण विभागातील समाजकल्याण निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. १२) रंगेहाथ पकडले. संदीप हरिभाऊ फुंदे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण निरीक्षक संदीप फुंदे यांनी ठेकेदाराला फोन करून कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार ठेकेदार कार्यालयात गेले असता, पूर्ण केलेल्या कामाचे प्रलंबित दायित्व मिळवून देण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला असल्याचे फुंदे यांनी सांगितले. मंत्रालयातून निधी मागविण्यासाठी तसेच निधी प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पुढील कार्यवाही करून पैसे मिळवून देण्यासाठी ७५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या मागणीबाबत ठेकेदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, अहिल्यानगर येथे लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान संदीप फुंदे यांनी पंचांसमक्ष ७५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समाजकल्याण कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संदीप फुंदे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारी ४ वाजून २२ मिनिटांनी त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलिस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलिस हवालदार संतोष शिंदे, रवी निमसे, कराड आणि छाया पोलीस हवालदार हारुण शेख यांचा समावेश होता.
काम पूर्ण पण बिले नाहीत…
या प्रकरणातील तक्रारदार हे ४२ वर्षीय सरकारी ठेकेदार आहेत. अहिल्यानगर महापालिका हद्दीतील केडगाव येथील सर्व्हे क्रमांक ४९/२ आणि ५०/१ मधील महापालिकेच्या जागेवर संत रोहिदास विकास केंद्र उभारण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १३ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यानुसार ठेकेदाराने संबंधित काम पूर्ण केले. या कामापोटी त्यांना आतापर्यंत २५ लाख रुपये मिळाले असून, उर्वरित २४ लाख ८० हजार ९८४ रुपये मिळणे बाकी होते. या निधीसंदर्भात महापालिकेकडून समाजकल्याण विभागाकडे पत्रव्यवहारही करण्यात आला होता.