Friday, November 13, 2026

केईएम रुग्णालयातील लिफ्ट समस्या लवकर सोडवणार; आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची ग्वाही

मुंबईतील केईएम रुग्णालयात ३१ पैकी ८ लिफ्ट बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयाची पाहणी करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच २,४२२ रिक्त पदे, अग्निसुरक्षा आणि नर्सिंग कॉलेजच्या ३६ मजली इमारतीच्या कामाचाही आढावा घेतला.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राजे एडवर्ड स्मारक अर्थात के. ई. एम. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार केंद्राची लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी संबंधित रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. अस्थिव्यंगोपचार केंद्रातील लिफ्ट अत्यंत जुनी असल्याने तिच्या जागी दोन नवीन लिफ्ट उभारण्याचा पर्याय यापूर्वी सुचविण्यात आला होता. मात्र, अद्याप या कामाला सुरुवात झालेली नसल्याबाबतही आरोग्य समिती अध्यक्षांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

केईएम रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार इमारतीतील संबंधित लिफ्ट प्रकरणानंतर याठिकाणी पाहणी केली.यावेळी माजी महापौर नगरसेविका श्रध्दा जाधव तसेच नगरसेविका श्रध्दा पेडणेकर या उपस्थित होत्या. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता हरिष पाठक यांच्यासह इतर रुग्णालयातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी लिफ्ट किती दिवसांपासून बंद आहे, तिच्या दुरुस्तीसाठी आणखी किती कालावधी लागणार आहे, तसेच लिफ्ट सुरू होईपर्यंत रुग्णांसाठी कोणती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल येत्या दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देशही भांदिर्गे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

सध्या केईएम रुग्णालयात एकूण ३१ लिफ्ट असून त्यापैकी ८ लिफ्ट बंद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यातील काही लिफ्टच्या दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, अस्थिव्यंगोपचार केंद्रातील लिफ्ट अत्यंत जुनी असल्याने तिच्या जागी दोन नवीन लिफ्ट उभारण्याचा पर्याय यापूर्वी सुचविण्यात आला होता. मात्र, अद्याप या कामाला सुरुवात झालेली नसल्याबाबतही आरोग्य समिती अध्यक्षांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

फेज-२ मधील अग्निसुरक्षा आणि मनुष्यबळाचा आढावा

रुग्णालयातील फेज-२ अंतर्गत अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या एकूण ५,९१२ पदांपैकी तब्बल २,४२२ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली. रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही यावेळी चर्चा करण्यात आली.

नर्सिंग कॉलेजच्या इमारतीचे काम लवकर सुरू करण्याची सूचना

केईएम रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजसाठी प्रस्तावित ३६ मजली इमारतीच्या बांधकामाचाही विषय यावेळी उपस्थित करण्यात आला. या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, संबंधित प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णालयातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि आवश्यक सोयीसुविधांमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, अशी भूमिका आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी यावेळी मांडली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >