Sunday, November 15, 2026

Sharad Kapoor: कधीकाळी खलनायकाच्या भूमिकांनी गाजवला पडदा, आज कामासाठी शरद कपूर यांचे भावनिक आवाहन!

फुटबॉल खेळताना अभिनेता शरद कपूर यांच्या पायाचे हाड मोडले असून त्यांना दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शारीरिक अडचणींमुळे त्यांच्या चार कुत्र्यांना तात्पुरते प्राणी कल्याण संस्थेकडे ठेवण्यात आले असून, त्यांनी पुन्हा काम करण्यासाठी भावनिक आवाहन केले आहे.

90 च्या दशकातील आणि 2000 च्या सुरुवातीच्या हिंदी आणि बंगाली सिनेमातील धाकधूक वाढवणारा खलनायक, रांगडा गँगस्टर आणि शिस्तबद्ध लष्करी अधिकारी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शरद कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल काळजी आणि प्रेम दोन्ही व्यक्त होत आहे. मुंबईस्थित बेजुबान पब्लिक वेल्फेअर ट्रस्टच्या संस्थापक हेमा चौधरी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात शरद कपूर यांच्या चार कुत्र्यांना प्राणी कल्याण संस्थेकडे का पाठवले जात आहे, याबाबत माहिती देण्यात आली होती. शारीरिक आणि आरोग्याच्या अडचणींमुळे त्यांना कुत्र्यांची काळजी घेणे कठीण होत असल्याचे सांगण्यात आले. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर शरद कपूर यांच्यासाठी काळजी व्यक्त करणारे अनेक संदेश आले.

आता कशी आहे प्रकृती?

बार्सिलोनामध्ये फुटबॉल खेळताना शरद कपूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पायाचे हाड मोडले असून दोन महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. याच कारणामुळे कुत्र्यांना तात्पुरते दुसरीकडे ठेवण्यात आले आहे. शरद कपूर यांनी कामासाठी आवाहन केले आहे. "मला फक्त चांगलं काम हवं आहे. मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. थोडा मानसिक आधारही माझ्यासाठी पुरेसा आहे. मी एक उत्तम अभिनेता आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पैशाचा प्रश्न नाही," असे ते म्हणाले. जानेवारी २०२७ पर्यंत ते बरे होतील आणि नवीन बंगल्यात गेल्यानंतर आपल्या कुत्र्यांना परत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सहाय्यक दिग्दर्शक ते व्हिलनपर्यंतचा प्रवास

शाहरुख खानसोबत 'जोश' चित्रपटात प्रकाश शर्माची भूमिका साकारण्यापूर्वी शरद कपूर यांनी १९९१ मध्ये आलेल्या 'लक्ष्मणरेखा' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर १९९४ मध्ये 'मेरा प्यारा भारत' या चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. महेश भट्ट यांच्या 'स्वाभिमान' या मालिकेतही ते दिसले होते. 'जोश' हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेला चित्रपट ठरला. २००० मध्ये आलेल्या या चित्रपटात त्यांनी शाहरुख खानच्या मॅक्सच्या विरोधात असलेल्या बिच्छू गँगचा नेता प्रकाश शर्माची भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते. त्याआधी महेश भट्ट यांच्या १९९६ मधील 'दस्तक' चित्रपटात त्यांनी सुष्मिता सेनसोबत काम केले होते. यात त्यांनी तिच्या मागे लागलेल्या मानसिक विकृती असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. महेश मांजरेकर यांच्या 'हत्यार' चित्रपटातही त्यांनी संजय दत्तसोबत एकनिष्ठ पण तापट गँगस्टरची भूमिका केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >