
SpaceX : अंतराळ क्षेत्रात स्पेसएक्सने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एलॉन मस्क यांच्या कंपनीचे स्टारशिप अंतराळयान 22 तासांचा प्रवास पूर्ण करून शनिवारी (14 नोव्हेंबर 2026) पृथ्वीवर परतले. टेक्सासमधील स्टारबेस केंद्रावर एका मोठ्या यांत्रिक हाताने या अंतराळयानाला हवेतच पकडले. अंतराळयान परत मिळवण्याची ही पहिली यशस्वी घटना ठरली आहे. भविष्यात रॉकेटचा पुन्हा वापर करता यावा, या स्पेसएक्सच्या प्रयत्नांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.
काय आहे मेकाझिला यंत्रणा?
स्टारशिपने टेक्सासमधील स्पेसएक्सच्या स्टारबेस केंद्रावर उतरताना ढगांमधून खाली येत आपली इंजिने पुन्हा सुरू केली. त्यानंतर अंतराळयानाने सरळ स्थिती घेत लॉन्च टॉवरच्या दिशेने प्रवास केला. या टॉवरवर असलेल्या 'मेकाझिला' नावाच्या मोठ्या यांत्रिक हातांनी त्याला हवेतच पकडले. यान पकडल्यानंतर त्याची इंजिने बंद करण्यात आली. त्यामुळे ते जमिनीला स्पर्श न करता काही काळ हवेत स्थिर राहिले.
View this post on Instagram
स्पेसएक्सने शेअर केला व्हिडिओ
या ऐतिहासिक कामगिरीचा व्हिडिओ स्पेसएक्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये स्टारशिप लॉन्च टॉवरकडे खाली येताना आणि मेकाझिलाच्या यांत्रिक हातांमध्ये अडकताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कंपनीने संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. स्पेसएक्सचे समालोचक डॅन हुओट यांनीही या कामगिरीबद्दल आश्चर्य आणि आनंद व्यक्त केला.
सुपर हेवी बूस्टरचा स्फोट
मात्र, या मोहिमेत स्पेसएक्सला पूर्ण यश मिळाले नाही. स्टारशिप सुरक्षितपणे परत आले असले, तरी त्याला अंतराळात घेऊन जाणाऱ्या सुपर हेवी बूस्टरला परत मिळवता आले नाही. शुक्रवारी प्रक्षेपणानंतर काही वेळातच या बूस्टरचा स्फोट झाला. त्यामुळे रॉकेटचे दोन्ही भाग सुरक्षितपणे परत मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीही स्टारशिपला हवेत पकडण्याची कामगिरी अंतराळ संशोधन क्षेत्रातील महत्त्वाची घटना ठरली आहे.






