Mumbai Diwali Crackers : मुंबईत फटाके फुटलेच!

उच्च न्यायालयाने हे आदेश स्यु मोटो दाखल करून का दिले होते? याचा सर्वप्रथम अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. आपला दिवाळी सण उत्साहात साजरा होवू नये असा न्यायालयाचा उद्देश नव्हता.

सचिन धानजी


मुंबईत दिवाळीत फटाके फुटलेच. लोकांनी न्यायालयाचे निर्देशाला न जुमानता फटाके फोडले. नागरिकांच्या भाषेत बोलायचं झालं तरी यंदाच्या दिवाळीत सर्वांधिक फटाके फोडले गेले. दिवाळी हा आनंदाचा सण आहे आणि फटाक्यांची आतषबाजी करत मुंबईकरांनी हा सण साजरा केला. पण हा सण साजरा करताना मुंबईकर सामाजिक भान विसरले. सण मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो. सणाचा उत्सव साजरा करताना त्यातून कोणत्याही नागरिकांना याचा त्रास होवू नये याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेणे हे आवश्यक असते. पण दिवाळीच्या सणात हे चित्र दिसले नाही. खरंतर मुंबई उच्च न्यायालयाने सर्व सार्वजनिक रस्ते, गल्ल्यांमध्ये फटाके फोडण्यास बंदी घातली असून शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यावर पूर्ण प्रतिबंध घातला. उच्च न्यायालयाने हे आदेश स्यु मोटो दाखल करून का दिले होते? याचा सर्वप्रथम अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. आपला दिवाळी सण उत्साहात साजरा होवू नये असा न्यायालयाचा उद्देश नव्हता. तर या निर्देशामागे मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखणे हाच मुख्य उद्देश होता. सण साजरा करताना मुंबईकरांचे आरोग्य हे फटाक्यांच्या वाढत्या आवाजामुळे, ध्वनी आणि त्यातून निघणाऱ्या धुरामुळे निघणाऱ्या वायू प्रदूषणाने बिघडू नये हाच यातील मुख्य उद्देश होता.


परंतु आमचा सण कसा साजरा करावा, कमी फटाके फोडावे असे सांगणारे न्यायालय कोण असा प्रश्न जेव्हा काहींच्या मनात निर्माण होतो, तेव्हा त्या व्यक्तींच्या मनात समाजाबद्दलची काळजी कळते, आज न्यायालयाच्या निर्देशानंतरही मुंबईत कधी नव्हे ते जास्त फटाके लावले गेले. मुंबईत हे फटाके लावले जात असताना किमान न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस आणि महापालिकेने कारवाई केली असती तरी यंदा फटाके वाजवण्याचे प्रमाण नियंत्रणात आले असते. फटाके वाजवणाऱ्यांवर आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके विकणाऱ्यांवर विशेषत: रॉकेटसह आकाशात फोडल्या जाणाऱ्या तसेच मोठ्या आवाजाच्या बॉम्बसह इतर फटाक्यांवर पोलिस आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करून ते जप्त करणे तसेच वाजवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक होते. एवढी जरी कारवाई केली असती तरीही हे प्रमाण कमी झाले असते. पण न्यायालयाच्या निर्देशाचे पालन एरव्ही करणाऱ्या पोलिस आणि महापालिकेला दिवाळीत या निर्देशाची आठवण न होणे हे हास्यास्पद आहे. किंबहुना ते आपल्या कर्तव्यापासून दूर राहिले, असे म्हणता येईल.


त्याचा परिणाम असा झाला की पाच दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या ५००हून अधिक आगीच्या दुर्घटना घडल्या, त्यात ३४० हून अधिक आगीच्य घटना या केवळ आणि केवळ फटाक्यांमुळे लागल्या गेल्या. मग प्रश्न असा उपस्थित होतो की न्यायालयाने फटाक्यांवर निर्बंध घातल्याने नागरिकांनी अधिक फटाके लावले? आणि फटाके लावताना कुठेही काळजी न घेता बेशिस्तपणे वाजवले गेले त्याचा हा परिणाम ? मुळात फटाक्यांमुळे आगी लागण्यास दोनच प्रकारचे कारणीभूत आहेत. ते म्हणजे हवेत उडणारे रॉकेट आणि दुसरे म्हणजे आकाशात जावून आतषबाजी करणारे फटाके. त्यामुळे पुढील वेळेस न्यायालयाला ध्वनी आणि वायू प्रदुषणाचा विचार करताना आगी लागण्यास कारणीभूत असलेल्या अशा फटाक्यावंर बंदी घालण्याचाही विचार करावा लागेल.


आज फटाक्यांच्या आगींमुळे मोठ्याप्रमाणात वित्त हानी झालीच. शिवाय दोन जणांचे जीव गेले. आठ जण जखमी झाले. पण यासर्व आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवताना मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी जे काही काम केले आहे, ते कौतुकास पात्र आहे. आपण दिवाळीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी फटाके फोडत होतो आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान यामुळे लागणाऱ्या आगी विझवण्यासाठी घरातील कुटुंबालाही वेळ न देता दिवसरात्र त्या आगीशी झुंजत होता. कारण हे सर्व जवान आगीशी झुंजत होते म्हणून आपण आपल्या घरात सुरुक्षित बसून कुटुंबासह दिवाळी साजरी करू शकलो, हे विसरुन जाणार नाही.


खरंतर या फटाक्यांबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर प्रदुषणाच्या मुद्दयाबाबत महापालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मिडियावर सेलिब्रेटींच्या माध्यमातून फटाके कमी वाजवण्याबाबत आवाहन केले. पण यामध्ये दिया मिर्झा यांनी केलेल्या आवाहनानंतर यामध्ये ठिणगी पडली गेली. त्यामुळे, फटाके अधिक वाजण्याचा उगम इथून झाला असावा, या संशयाला जागा मिळते. कारण यावेळी न्यायालयाने स्यू मोटो दाखल करून हे निर्देश दिले असले तरी यापूर्वी सन २०२३, सन २०२४ आणि सन २०२५मध्ये वाढत्या प्रदुषणाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने जनतेला आवाहन करून दीपोत्सवात रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडावेत, अशी विनंती केली होती. शक्यतोवर, कमी आवाज होणारे आणि कमी प्रदूषण करणारेच फटाके फोडावे, असे आवाहनही तत्कालिन महापालिका आयुक्तांनी केले. परंतु या तीन वर्षांमध्ये जर जनता महापालिकेच्या आवाहनाचे पालन करत असेल आणि यावर्षी न्यायालयाचे निर्देश असूनही पालन करत नसतील तर संशोधनाचा भाग आहे.


मुळात जर प्रदुषणाच्या दृष्टीकोनातून हे आदेश दिले असतील तर नागरिकांना आपल्या आणि आपल्या आसपासच्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता कमीत कमी आवाजाचे फटाके फोडून दिवाळीचा सण साजरा करायला काय हरकत आहे. मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच एक्यूआय जर १०० च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत असेल तर त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य नाही का? या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये एक्यूआयची पातळी काही भागांमध्ये २०० च्या आसपास गेली होती. परंतु या वाढत्या फटाक्यांमुळे नागरिकांचा जो आजार बळावला त्याला कारणीभूत कोण? महापालिकेला दोष देणे सोपे असते. सरकारला दोष देणे सोपे असते. पण आपण यासाठी काय प्रयत्न करतो. महापालिका आणि सरकारला काय सहकार्य करतो याचे प्रत्येक नागरिकांनी आत्मचिंतन करावे?
माझ्या परिचयातील वाकोला येथे एक ज्येष्ठ नागरिक महिला मला नेहमी फोन करून सांगायच्या की मी घरात दारे खिडक्या बंद करून एसी लावून बसली आहे. कारण फटाक्यांचा आवाज आणि त्यांचा धूर मला सहन होत नाही. मला अस्थमा आहे. दिवाळीच्या या सणात मला खाली उतरताही येत नाही. दिवाळीचा हा सण तुम्ही आनंदाचा सण म्हणतात, पण हे जे कोणी फटाके वाजवतात, त्यांच्यामुळे आम्हाला आमचा सण आनंदात साजरा करता येत नाही. आम्हाला या सणात कोंडून घ्यावे लागते. मग तुमचे बीएमसी आणि पोलिस काय करतात. खरंतर ही खंत एका ज्येष्ठ नागरिकांची नसून अशाप्रकारे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आहे. अनेक अस्थमा,दम्याचे आजारी रुग्ण असतील किंवा अन्य आजारांनी ग्रस्त असतील त्यांच्या या व्यथा आहेत. पण फटाक्यांच्या धुरामुळे जर आपल्याला तोंडावर रुमाल लावून आणि मास्क लावून फिरण्याची वेळ येत असेल तर आणि त्यानंतर रुग्णालयाच्या फेऱ्या कराव्या लागत असतील तर अशा फटाक्यांवर कायमचीच बंदी घालायला काय हरकत आहे. आपल्या सणांत फटाक्यांची आतषबाजी व्हायलाच पाहिजे असे कुठे लिहून ठेवले आहे. आणि असेलच तर एक ते दोन फटाके लावून तो आनंद साजरा करावा, त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करा करावा. तोच फटाक्यांचा पैसा जर जमा करून गोरगरीब जनतेच्या चुली पेटवण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद आपण दुसऱ्याच्या जीवनात वाटू शकलो, याचे समाधान मिळेल. कारण आपल्या भारतीय संस्कृतीत दीपावली सण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा आहे. आपल्याला चांगले आणि योग्य वागण्याची शिकवण देणारा हा सण असतो. पण दिव्यांच्या रोषणाईपेक्षा फटाक्यांच्या आतषबाजीकडे वळणाऱ्या नागरिकांनी किमान पुढील दीपोत्सवात तरी याची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा?

Comments
Add Comment

Prince William Sachin Tendulkar : ब्रिटीश शाही जोडपे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन यांची मुंबईत सचिन तेंडुलकरसोबत 'गल्ली क्रिकेट'ची धमाल; शाळकरी मुलांसोबत रंगला सामना!

मुंबई : मुंबईच्या बॅलार्ड इस्टेट भागात सोमवारी सकाळी एक अतिशय सुंदर आणि न विसरता येण्यासारखा प्रसंग पाहायला

Prince William India Visit : प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन आज मुंबईत दाखल होणार; अर्थशॉट पुरस्कार सोहळ्यासाठी भारत दौरा

मुंबई : ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन हे तीन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज मुंबईत

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही