
नाशिक : डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर गंगापूर पोलिसांनी संशयित डॉ. नीलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने हा खटला पटलावर घेण्यास परवानगी दिली असून, मंगळवार, 17 नोव्हेंबरपासून न्यायालयीन कार्यवाही सुरू होणार आहे.
या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी चर्चा निर्माण झाली होती. 6 मार्च 2026 रोजी डॉ. मनीषा जेजूरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. नीलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघांनाही झाली होती अटक
डॉ. नीलेश जेजूरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तत्कालीन मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. तर डॉ. स्वाती चव्हाण यादेखील त्याच विभागात कार्यरत होत्या. या प्रकरणात पोलिसांनी 18 सप्टेंबर रोजी डॉ. नीलेश यांना अटक केली. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी डॉ. स्वाती चव्हाण यांनाही अटक करण्यात आली होती.
डॉ. स्वाती चव्हाण यांना 10 ऑक्टोबर रोजी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनदाराच्या हमीवर जामीन मंजूर झाला. दुसरीकडे डॉ. नीलेश जेजूरकर यांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, 28 ऑक्टोबर रोजी नाशिक सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे ते सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर या महत्त्वाच्या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाने आता वेग घेतला ...
चॅट आणि कॉलचे पुरावे ठरणार महत्त्वाचे ?
या प्रकरणातील तपासात मोबाइलमधील चॅटिंग आणि कॉलशी संबंधित पुरावे महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही संशयितांच्या मोबाइलमधील चॅटिंगचे पुरावे फॉरेन्सिक विभागामार्फत पोलिसांना प्राप्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. 5 मार्च रोजी लग्नसमारंभात झालेला कथित जाहीर अपमान आणि त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 मार्च रोजी घडलेली आत्महत्येची घटना, या दोन्ही घटनांमधील कमी कालावधी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांव्यतिरिक्त अन्य गंभीर शक्यतांचाही तपासाच्या अनुषंगाने विचार केला जात असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.
आता न्यायालयीन सुनावणीकडे लक्ष
पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने खटला पटलावर घेतला आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरपासून या प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाही सुरू होणार आहे. आता या खटल्यात सादर होणारे पुरावे, फॉरेन्सिक अहवाल, मोबाइलमधील चॅट आणि कॉलचे तपशील तसेच साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत. डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात नेमके काय सत्य समोर येते आणि न्यायालय काय निर्णय देते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.





