
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकासकामांना वेग आला आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनापासून पायाभूत सुविधा, भाविकांसाठीच्या सोयीसुविधा आणि प्रशासकीय निर्णयांपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि भाविकांनी कुंभमेळ्याशी संबंधित माहिती मिळवताना केवळ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांचाच आधार घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
सध्या सोशल मीडियावर कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात विविध प्रकारच्या बातम्या, संदेश आणि माहिती प्रसारित होत आहे. मात्र, यातील प्रत्येक माहिती अधिकृत असेलच असे नाही. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची अधिकृत माध्यमांतून खातरजमा करणे आवश्यक आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते अधिकृत वेबसाइटचे लोकार्पण
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या नियोजनाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान या अधिकृत वेबसाइटचे लोकार्पण करण्यात आले होते. या वेबसाइटवर कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित महत्त्वाची माहिती, विकासकामांची सद्यस्थिती, प्रशासकीय घोषणा आणि विविध उपक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले होते. https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित माहिती, महत्त्वाच्या घडामोडी आणि अधिकृत घोषणा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, प्राधिकरणाच्या सर्व अधिकृत समाजमाध्यम खात्यांच्या लिंक्सही या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना संकेतस्थळावरूनच प्राधिकरणाच्या विविध डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोचता येते.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील पायाभूत सुविधांची कामे, भाविकांसाठीच्या सोयीसुविधा, प्रशासकीय निर्णय, विविध उपक्रम आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती प्राधिकरणाकडून YouTube, Facebook, X आणि Instagram या माध्यमांतून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.
आयुक्त शेखर सिंह यांचे नागरिकांना आवाहन
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळा हा व्यापक लोकसहभाग आणि अनेक यंत्रणांच्या समन्वयातून पार पडणारा महत्त्वाचा सोहळा आहे. या अनुषंगाने नागरिक आणि भाविकांपर्यंत अचूक व अद्ययावत माहिती पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीसह विविध व्यवस्था आणि महत्त्वाच्या घोषणांची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाला आणि सोशल मिडिया हँडल्सला भेट द्यावी. समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतून करूनच ती पुढे प्रसारित करावी."
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची अधिकृत डिजिटल माध्यमे
संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in
YouTube : @official_ntkma
Facebook : @ntkmaofficial
X (Twitter) :
- @NTKMA_official
- @s_mahakumbh_IND
- @s_mahakumbh_MH
- @s_mahakumbh-glb
Instagram :
- @ntkma_official
- @simhastha.mahakumbh.ind
- @simhastha.mahakumbh.mh
- @simhastha.mahakumbh.glb






