Monday, November 16, 2026

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कावनई तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार ! 24.99 कोटींच्या विकासकामांना लवकरच सुरुवात

कावनई तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात भाविकांच्या सोयीसुविधांसह परिसराच्या सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. या विकास आराखड्यात एकूण 21 विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.

इगतपुरी : आगामी 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कावनई तीर्थक्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. कावनईच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 24.99 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2, इगतपुरी यांच्यामार्फत ही प्रक्रिया सुरू आहे. या विकास आराखड्यात एकूण 21 विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात कावनई येथे येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

21 विकासकामांमधून कावनईचा होणार कायापालट

कावनई तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात भाविकांच्या सोयीसुविधांसह परिसराच्या सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये ग्रंथालय, दुकाने, गोठाण, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या, संगीत कक्ष, वसतिगृह इमारत आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्याची कामे प्रस्तावित आहेत. तसेच मंदिराचे नूतनीकरण करून त्याचे सभागृहात रूपांतर करण्यासाठीही आवश्यक कामे केली जाणार आहेत. भाविकांसाठी पायऱ्या, घाट, संरक्षक भिंत, रेलिंग आणि दिशादर्शक फलक उभारण्यात येणार आहेत.

स्वच्छता, पाणी आणि सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन

तीर्थक्षेत्रात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (इको एसटीपी), भूमिगत पाण्याची टाकी, प्लंबिंग व्यवस्था, कचरापेट्या आणि सुरक्षा खांब यांचा समावेश आहे. याशिवाय परिसराचे सुशोभीकरण, वृक्षारोपणासाठी जागा, ध्वजस्तंभ उभारणी आणि जुन्या बांधकामांचे पाडकाम अशी विविध कामे प्रस्तावित आहेत.

कपिलधारा तीर्थक्षेत्रासह किल्ल्याचेही ऐतिहासिक महत्त्व

कावनईला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील कपिलधारा तीर्थक्षेत्र, महादेव मंदिर, कामाक्षी माता मंदिर आणि कावनई किल्ला ही प्रमुख आकर्षणे आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीनेही या परिसराला विशेष महत्त्व आहे. 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात या परिसरात मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा विकास आराखडा महत्त्वाचा ठरणार आहे.

24.99 कोटींच्या निधीमुळे विकासाला चालना

कावनई तीर्थक्षेत्रातील 21 विकासकामांसाठी 24.99 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना वेळेत सुरुवात होणे आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण झाल्यास कावनई तीर्थक्षेत्राला नवे रूप मिळण्यासोबतच धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे या विकासकामांच्या पुढील प्रक्रियेकडे इगतपुरी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >