मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आणि अवघ्या 15 वर्षांचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चांगलाच चर्चेत आहे. मात्र, भारतीय संघात त्याला पुरेशी संधी मिळत नसल्यावरून क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत अत्यंत महत्त्वाचे आणि परखड भाष्य केले आहे. वैभवची कारकीर्द महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यासारखी बहरणार की प्रतिभावान असूनही भरकटलेल्या विनोद कांबळीसारखी होणार, असा सवाल कपिल देव यांनी उपस्थित केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत वैभव सूर्यवंशीला केवळ 2 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. सलामीच्या स्थानावर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांसारखे खेळाडू असल्याने वैभवला बाकावर बसावे लागले. या संदर्भात 'मिड-डे'शी बोलताना कपिल देव म्हणाले की, "वैभवला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तो भारतीय संघाचा भाग असला तरी त्याला सध्या पुरेशा संधी मिळत नाहीत. आजकाल प्रेक्षकांना मैदानात आक्रमक खेळ पाहायला आवडतो आणि वैभवसारख्या तरुण खेळाडूचे चौकार-षटकार पाहणे आबालवृद्धांना आनंद देते. त्याच्याकडे प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही, पण त्याला थोडा अधिक वेळ देण्याची गरज आहे."
कपिल देव यांनी पुढे वैभवला वयाच्या या टप्प्यावर मिळणारी प्रसिद्धी आणि पैशांपासून सावध राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. "सध्या त्याचे वय त्याच्या बाजूने आहे. त्याने इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता केवळ आणि केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या टप्प्यावर लोक पैशांबद्दलही बोलू लागतात. त्याच्याकडे अफाट प्रतिभा आहे, पण त्याला अजून बराच प्रवास करायचा आहे," असे कपिल देव यांनी स्पष्ट केले.
"गौतम गंभीरने अगदी बरोबर बोलले!" मालिका जिंकूनही रवी शास्त्रींचा टीम इंडियाला मोठा इशारा; 2027 वर्ल्ड कपसाठी धोक्याची घंटा?
न्यूझीलंड दौऱ्यावरील चौथ्या वनडे सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाचव्या आणि अंतिम सामन्यात जबरदस्त ...
या संवादादरम्यान कपिल देव यांनी वैभवच्या भविष्याबाबत एक अत्यंत सूचक निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले की, "वयाच्या 15 व्या वर्षी त्याच्या डोक्यात फक्त क्रिकेट आहे. मात्र, जेव्हा तो 18 किंवा 19 वर्षांचा होईल, तेव्हा आयुष्यात इतर गोष्टी येतील; पार्ट्या आणि इतर अनेक प्रलोभने समोर उभी राहतील. अशा वेळी तो सचिन तेंडुलकरसारखा घडेल की विनोद कांबळीसारखा होईल? या टप्प्यावर हे सांगणे खूप कठीण आहे."
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विनोद कांबळी यांना अनेकदा सचिन तेंडुलकरपेक्षाही अधिक प्रतिभावान मानले गेले होते. मात्र, दोघांच्या कारकिर्दीने अत्यंत वेगवेगळी वळणे घेतली. सचिन तेंडुलकरने आपल्या शिस्तबद्ध आणि समर्पित वृत्तीच्या जोरावर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून आपली कारकीर्द गाजवली. दुसरीकडे, ग्लॅमरस जीवनशैली आणि मैदानाबाहेरील गोष्टींमुळे विनोद कांबळी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अकाली संपुष्टात आली. त्यामुळे कपिल देव यांनी वैभव सूर्यवंशीला दिलेला हा इशारा त्याच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत मोलाचा मानला जात आहे.