Tuesday, November 17, 2026

Virar Churchgate Local : धावत्या विरार-चर्चगेट लोकलमधील वादातून भिरकावलेला चाकू लागल्याने ५३ वर्षीय प्रवासी जखमी; वांद्रे स्थानकात तरुणाला अटक

१५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात एका तरुणाने समोरच्या व्यक्तीच्या दिशेने चाकू भिरकावला.

मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वादातून एका तरुणाने भिरकावलेला चाकू चुकून दुसऱ्याच प्रवाशाला लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी स्थानकाजवळ विरार-चर्चगेट (Virar - Churchgate Fast)जलद लोकलमध्ये घडलेल्या या घटनेत सुरेश शर्मा (वय ५३) हे प्रवासी जखमी झाले असून, याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात एका तरुणाने समोरच्या व्यक्तीच्या दिशेने चाकू भिरकावला. मात्र, नेम चुकल्याने हा चाकू तेथून प्रवास करणाऱ्या ५३ वर्षीय सुरेश शर्मा यांना जाऊन लागला आणि ते जखमी झाले. धावत्या लोकलमध्ये अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. प्रसंगावधान राखत प्रवाशांनी तातडीने साखळी ओढून (चेन पुलिंग) गाडी थांबवली. वांद्रे स्थानकावर लोकल थांबताच तेथे तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी धाव घेत शिवा गायकवाड (वय २५) या संशयित आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

या घटनेनंतर जखमी सुरेश शर्मा यांना तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वांद्रे लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) स्वाधीन करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >