Monday, November 16, 2026

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांच्या 25 बॅट्सचा अनोखा संग्रह; वानखेडे स्टेडियमवर ‘बॅटोग्राफी’ दालनाचे अनावरण

या दालनात त्यांच्या 35 वर्षांच्या क्रिकेट प्रवासातील 25 बॅट्स आणि वैयक्तिक संग्रहातील निवडक वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीतील खास आठवणी आता चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर पाहता येणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात सचिन यांना समर्पित ‘बॅटोग्राफी’ या विशेष दालनाचे अनावरण केले. या दालनात त्यांच्या 35 वर्षांच्या क्रिकेट प्रवासातील 25 बॅट्स आणि वैयक्तिक संग्रहातील निवडक वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास

16 नोव्हेंबर 2026 रोजी सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक उपस्थित होते. सचिन यांनी वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध 16 नोव्हेंबर 2013 रोजी आपला 200वा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या ऐतिहासिक क्षणाला 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दालनाचे अनावरण करण्यात आले.

या संग्रहाची सुरुवात 1978 मध्ये सचिन यांना त्यांच्या मोठ्या बहिणीने भेट दिलेल्या काश्मीर विलोच्या बॅटपासून होते. तर त्यांच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय डावात वापरलेल्या बॅटने या प्रवासाची सांगता होते. 1990 मध्ये मँचेस्टर येथे पहिले कसोटी शतक झळकावताना वापरलेली बॅट, 1998 मध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी भेट दिलेली बॅट आणि 2003 च्या विश्वचषकात वापरलेली बॅटही येथे पाहायला मिळणार आहे.

पहिले हेल्मेट, जर्सी आणि निरोपाच्या भाषणाची आठवण

बॅट्ससोबतच सचिन यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांशी संबंधित वस्तूही या दालनात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांचे पहिले हेल्मेट, मुंबई रणजी संघाची जर्सी, 200व्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाची जर्सी आणि हेल्मेट यांचा समावेश आहे. वानखेडेवर निरोपाचे भाषण देताना त्यांनी संदर्भासाठी वापरलेले कागदाचे पानही येथे पाहायला मिळणार आहे.

या प्रसंगी सचिन यांनी आपल्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक बॅटसोबत एखादा खास सामना, ड्रेसिंग रूम, खेळपट्टी किंवा चाहत्यांच्या जल्लोषाची आठवण जोडलेली असल्याचे त्यांनी सांगितले. वानखेडेवर या सर्व बॅट्स एकत्र पाहणे आनंददायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एका वर्षात 23 हजारांहून अधिक अभ्यागत

एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, संग्रहालय आणि वानखेडे स्टेडियम दौऱ्याला अभ्यागतांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हा दौरा सुरू झाल्यापासून एका वर्षात 23 हजारांहून अधिक लोकांनी संग्रहालय आणि स्टेडियमला भेट दिली आहे.

एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात मुंबई आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासाशी संबंधित 20 हून अधिक दालने आहेत. येथे दिग्गज क्रिकेटपटूंच्या बॅट्स, जर्सी, बॉल्स, ग्लोव्हज, छायाचित्रे आणि इतर स्मृतिचिन्हे पाहायला मिळतात. प्रश्नमंजूषा आणि दृकश्राव्य कक्षासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

तिकिटे कुठे मिळणार?

संग्रहालय आणि स्टेडियम दौऱ्याची तिकिटे 17 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीसाठी ‘डिस्ट्रिक्ट’ (District) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या दौऱ्याच्या तिकिटामध्ये सचिन तेंडुलकर यांचे ‘बॅटोग्राफी’ दालन पाहण्याची संधीही मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >