Tuesday, November 17, 2026

Nashik : नाशिक जिल्ह्यात बालविवाहांचे प्रयत्न सुरूच ! बालविवाहाचे 111 प्रकार उघड, तिघांवर गुन्हे दाखल

जिल्ह्यात बालविवाहाच्या सर्वाधिक २३ तक्रारी मालेगाव येथून प्राप्त झाल्या आहेत. त्याखालोखाल नाशिक तालुक्यात १६, तर सिन्नर तालुक्यात १५ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

नाशिक : बालविवाह रोखण्यासाठी शासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून जनजागृती केली जात असतानाही नाशिक जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत बालविवाहासंदर्भात तब्बल १११ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे ८० कुटुंबांनी बालविवाहाचा निर्णय मागे घेत विवाह पुढे ढकलण्यास संमती दिली आहे. तर तीन गंभीर प्रकरणांमध्ये संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात बालविवाहाच्या सर्वाधिक २३ तक्रारी मालेगाव येथून प्राप्त झाल्या आहेत. त्याखालोखाल नाशिक तालुक्यात १६, तर सिन्नर तालुक्यात १५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे पेठ, कळवण आणि नांदगाव तालुक्यांत बालविवाहासंदर्भातील एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. प्राप्त तक्रारींपैकी १३ तक्रारी खोट्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले. काही प्रकरणांमध्ये अपुरी माहिती देण्यात आली होती, तर काही ठिकाणी संबंधित मुलगा आणि मुलगी विवाहासाठी कायदेशीर वयाचे असल्याचे स्पष्ट झाले.

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाइन आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे काम करत आहेत. बालविवाहाची माहिती मिळताच संबंधित पथक घटनास्थळी पोहोचून पालकांचे समुपदेशन करते. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, शिक्षणावर होणारा परिणाम आणि कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी याबाबत पालकांना माहिती दिली जाते. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत ८० कुटुंबांनी विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बालविवाहाच्या नावाखाली वैयक्तिक वाद किंवा गैरसमजातून खोट्या तक्रारी दाखल होण्याचे प्रकारही समोर आले आहेत. मात्र, प्रशासनाच्या समुपदेशनानंतरही नियमांचे उल्लंघन करून बालविवाह करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. सध्या १५ प्रकरणांमध्ये तपास आणि चौकशी सुरू असून, एका तक्रारीवर पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जात आहे.

ग्रामीण आणि आदिवासी भागांत बालविवाहाच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत असलेली अनास्था, एकल पालक कुटुंबांमधील आर्थिक आणि सामाजिक अडचणी, मुलींच्या सुरक्षिततेविषयीची चिंता तसेच अत्याचारांच्या घटनांमुळे काही पालक कमी वयातच मुलींचे लग्न लावण्याचा निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सुनील दुसाने यांनी सांगितले की, ग्रामीण भागात आजही मुलींच्या शिक्षणाबाबत अपेक्षित जागरूकता दिसून येत नाही. काही कुटुंबांमध्ये मुलींची जबाबदारी लवकर संपविण्याच्या विचारातून बालविवाह केले जातात. आर्थिक अडचणी आणि मुलींच्या सुरक्षिततेची चिंता हीदेखील त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत.

बालविवाहाची माहिती मिळाल्यास १०९८ वर संपर्क साधा

बालविवाह हा कायद्याने दंडनीय अपराध आहे. आपल्या परिसरात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती माहिती लपवून न ठेवता तातडीने चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >