Tuesday, November 17, 2026

Nashik : नाशिकच्या निफाड, सिन्नर अन् येवला तालुक्यांतील 35 गावांत 22 तास वीज पुरवठा खंडित ! पाहा कोणत्या गावांचा समावेश ?

दारणा धरणातून १८ नोव्हेंबरपासून रब्बी हंगाम २०२६-२७ चे आवर्तन सोडण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यांतील काही गावांमध्ये दररोज २२ तास वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

नाशिक : रब्बी हंगामातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरळीत व्हावे, तसेच दारणा धरणाचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दारणा धरणातून रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सिंचन व बिगर सिंचनाचे आवर्तन १८ नोव्हेंबर २०२६ पासून प्रस्तावित करण्यात आले आहे. या आवर्तनातील पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्यासह सिंचन व पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यांतील काही गावांमध्ये रोहित्राचा दररोज २२ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार, १८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२६ या कालावधीत संबंधित गावांतील कालव्यालगतच्या रोहित्रांचा वीजपुरवठा दररोज २२ तास खंडित राहणार आहे. केवळ सकाळी ६ ते ८ या दोन तासांच्या कालावधीत वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक तसेच उपकार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत. दि. १८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२६ या कालावधीत दारणा धरण ते नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंतचा दारणा नदीचा भाग, गोदावरी नदीचा भाग तसेच गोदावरी उजवा व डावा तट कालवा या ठिकाणांवरून पाणी घेणाऱ्या सर्व अनधिकृत उपसा सिंचन योजनांचा विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कोणत्या गावांमध्ये वीजपुरवठ्यावर निर्बंध ?

निफाड तालुका : म्हाळसाकोरे, तामसवाडी, ब्राह्मणवाडा, तारुखेडले, खानगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, नांदूरमध्यमेश्वर, धारणगाव वीर, गाजरवाडी, धारणगाव खडक, कानळद, देवगाव, शिरवाडे, वाकद, धानोरे, नांदगाव, देहगाव आणि रुई.

सिन्नर तालुका : चोंढी, मेंढी, सांगवी, सोमठाणे, दहिवाडी, कोळगाव माळ, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, शहापूर, वारेगाव, कोळगाव थडी आणि हडेवाडी.

येवला तालुका : महालखेडा, निमगाव मठ, मुखेड आणि सत्यगाव.

अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवरही कारवाई

दारणा धरण ते नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंतचा दारणा नदीचा भाग, गोदावरी नदीचा भाग तसेच गोदावरी उजवा आणि डावा तट कालवा येथून पाणी घेणाऱ्या अनधिकृत उपसा सिंचन योजनांचाही वीजपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करून पाणी उपसा केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी 

आवर्तनादरम्यान सिंचनासाठी आणि पिण्यासाठी राखीव असलेले पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर सोपविण्यात आली आहे. तसेच निर्धारित कालावधीतच पाण्याचे वितरण करावे आणि ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पाणी सोडू नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरण, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे १८ नोव्हेंबरपासून पुढील महिनाभर संबंधित गावांतील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार सिंचनाचे नियोजन करावे लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >