Tuesday, November 17, 2026

चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमीतून चारा लागवडीला चालना

राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेतून चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतातच नव्हे, तर गावातील सामुदायिक जमिनीवरही चारा लागवड करता येणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी मंत्रालयात ही माहिती दिली. २०२६ मध्ये पावसाचं असमान वितरण, खरीप उत्पादनात घट आणि रब्बीच्या पेरणीत होणारी संभाव्य घट यामुळे चारा टंचाई निर्माण होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

या योजनेत आता मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूणघास, ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट या सात नवीन चारा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी मंजूर असलेल्या चारा पिकांसोबत आता या पिकांचीही लागवड करता येणार आहे. 'व्हीबी जी राम जी' योजनेतील उपजीविकेशी संबंधित कामांमध्ये सामुदायिक चारा लागवड आणि वैयक्तिक चारा लागवड या दोन कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकरी आणि गाव पातळीवरही चारा उत्पादन घेता येईल.

चारा लागवडीसाठी बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, आयसीएआर आणि कृषी विज्ञान केंद्रांकडून घेता येणार आहे. कमी पाणी लागणारी, लवकर उत्पादन देणारी आणि एकापेक्षा जास्त वेळा कापणी करता येणारी पिकं यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. स्थानिक हवामान आणि जमिनीनुसार कोणतं वाण घ्यावं, याबाबत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. ही कामं पशुसंवर्धन, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीमार्फत राबवली जाणार आहेत. मजुरांच्या कामाला प्राधान्य असल्याने मजुरांकडून होणाऱ्या कामांसाठी यंत्रांचा वापर करता येणार नाही. एकदा ज्या शेतात चारा लागवड केली, त्याच शेतात पुन्हा त्याच योजनेतून काम घेता येणार नाही. या निर्णयामुळे दुष्काळात पशुधनाला चारा मिळेलच, शिवाय ग्रामीण भागात रोजगारही निर्माण होईल, असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >