मागील १५ वर्षांपासून प्रलंबित कांदिवली पश्चिम येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल २७ बांधकामे हटवली
November 17, 2026 07:36 PM
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी आवश्यक मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी तोडक कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने, कांदिवली पश्चिम येथील मथुरादास मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी २७ बांधकामे सोमवारी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी हटवण्यात आली. महापालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.या ठिकाणी असलेल्या सुमारे ११० मीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणात मागील १५ वर्षांपासून ही २७ बांधकामे अडथळा ठरत होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत त्यांना थापाडे म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ ...
आता या रुंदीकरणाच्या कामातील अडथळे दूर झाल्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील, विशेषतः कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत अपेक्षित आहे.
उपायुक्त (परिमंडळ ७) मनिष वळंजू, आर दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त आरती गोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आर दक्षिण’ विभागामार्फत ही निष्कासन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईसाठी ४ जेसीबी, ४० कामगार आणि १० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच, वायुप्रदूषण नियंत्रणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी धूळ नियंत्रणाच्या उद्देशाने मिस्ट मशिन्सचा वापर करण्यात आला. रस्ता रुंदीकरणामुळे या परिसरातील वाहतुकीस अधिक सुलभता प्राप्त होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे.