
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत त्यांना थापाडे म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. २०१९ मध्ये महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला दिलेला शब्द मोडून सत्तेसाठी भाजपची साथ सोडणारेच आज इतरांवर आरोप करत आहेत. त्यामुळे खरे थापाडे कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे जनतेने दिलेल्या कौलानुसार राज्यात युतीचे सरकार स्थापन होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी जनतेचा विश्वासघात करण्यात आला आणि निवडणुकीत सोबत असलेल्या भाजपलाही दूर करण्यात आले. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी युती तोडणाऱ्यांनी आता दुसऱ्यांना नैतिकतेचे धडे देऊ नयेत. अमित शाह यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचा आणि २०१९ मधील घडामोडींचा विचार करावा, असे शिंदे म्हणाले.
मुंबई: शिर्डी विमानतळ परिसरातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून पंचतारांकित हॉटेल विकसित करण्यात येणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करून माध्यमांचे लक्ष वेधण्याचा काही विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. कोणताही ठोस आधार नसताना आरोप करायचे, त्यावरून प्रसिद्धी मिळवायची आणि सतत चर्चेत राहायचे, अशी त्यांची राजकीय रणनीती असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. मात्र, जनतेला राजकारणातील वास्तव समजते. केवळ आरोप केल्याने सत्य बदलत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही विरोधकांना सुनावले. सध्या शेतकरी दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक अडचणींमुळे अडचणीत आहे. अशा परिस्थितीत त्याला प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या घोषणा करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी नेमके काय केले, याचे उत्तर द्यावे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणींचा वापर राजकीय आरोपांसाठी करणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांच्या टीकेवर उपरोधिक भाष्य करताना शिंदे म्हणाले की, काही लोकांना दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशिवाय दुसरा कोणताही विषय दिसत नाही. त्यांना मोदी फोबिया आणि अमित शाह फोबिया झाला आहे. संताजी-धनाजींच्या इतिहासाचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांवर खोचक टिप्पणी केली आणि त्यांच्या राजकीय भूमिकेची खिल्ली उडवली. २०१९ मध्ये जनतेचा कौल आणि युतीचा विश्वास मोडून सत्तेसाठी वेगळी भूमिका घेणाऱ्यांनी आज दुसऱ्यांवर थापाडेपणाचे आरोप करणे म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डांटे' अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील जनता २०१९ मधील घडामोडी विसरलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी इतरांवर आरोप करण्याआधी स्वतःच्या राजकीय इतिहासाचे आत्मपरीक्षण करावे, अशा आक्रमक शब्दांत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.






