
उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये दोन दिवसांत झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमध्ये एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री रुद्रप्रयाग जिल्ह्यात बोलेरो गाडी खोल दरीत कोसळली. तर मंगळवारी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली पाण्यात कोसळली. दोन्ही ठिकाणी बचाव पथकांकडून मदतकार्य करण्यात आले.
रुद्रप्रयागमध्ये बोलेरो 500 मीटर खोल दरीत कोसळली
सोमवारी रात्री उशिरा रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बांसवाडा-कंधारा महामार्गावर हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी सुमारे 500 मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी गाडीत 10 जण होते. हे सर्वजण लग्नसमारंभातून आपल्या गावी परतत होते.
या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, डीडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली.
अंधार आणि खोल दरीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, पथकांनी स्ट्रेचरच्या मदतीने सर्व 6 जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
A Haridwar–Badrinath bus fell about 100 metres off a bridge into a riverbed in Uttarakhand's Tehri this morning.
At least 6 people are dead and around 20 injured. The bus was carrying 30-35 passengers. SDRF teams pulled the injured out and rushed them to AIIMS Rishikesh. https://t.co/rTE4gKyn9d — The Indian Idiot (@theindianidiot) November 17, 2026
ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर बस पुलाखाली कोसळली
मंगळवारी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावरील गुलार बाजारजवळ दुसरा अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी बस अनियंत्रित होऊन पुलाखाली सुमारे 100 मीटर खोल पाण्यात कोसळली. बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवासी असल्याची माहिती आहे.
या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका प्रवाशाचा एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत 18 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एसडीआरएफ आणि पोलिसांकडून बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफच्या ब्यासी आणि धलवाला चौक्यांमधील पथके घटनास्थळी दाखल झाली. एसडीआरएफ कमांडर अर्पण यदुवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त बचाव पथकेही पाठवण्यात आली. स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफकडून समन्वयाने मदतकार्य सुरू करण्यात आले. दोन्ही अपघातांमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.






