Wednesday, November 18, 2026

Multibagger Stock : एका दिवसात 233% झेप! या फार्मा शेअरने गुंतवणूकदारांना दिला छप्परफाड परतावा

कॅन्सरवरील संभाव्य लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतर अमेरिकेतील सेलास लाईफ सायन्सेसच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात मोठा नफा मिळाला.

एखादा स्टॉक कधी आश्चर्यकारक कामगिरी करून गुंतवणूकदारांना श्रीमंत करेल आणि दुसरा कधी त्यांना कंगाल करेल, याचा अंदाज लावणे कठीण आहे. तथापि, भारतापासून ते अमेरिकेपर्यंतच्या शेअर बाजारांमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांसाठी पैसे छापण्याच्या यंत्रांसारखे बनले आहेत. असाच एक स्टॉक म्हणजे औषधनिर्माण क्षेत्रातील दिग्गज कंपनी सेलास लाईफ सायन्सेस ग्रुपचा आहे. जी भारतात नव्हे ते अमेरिकेच्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहे. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या या बायोटेक फार्मास्युटिकल कंपनीचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे असून तिचे शेअर्स नॅसडॅकवर सूचिबद्ध आहेत.

मंगळवारी एका बातमीनंतर या स्टॉकमध्ये असे वादळ आले की गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला. सेलास लाईफ सायन्सेसचा शेअर उघडताच १५ नोव्हेंबरच्या $७.९९ च्या बंद भावाच्या तुलनेत गुंतवणूकदारांना आश्चर्य वाटले. कारण तो $२४ च्या वर उघडला होता. एवढेच नाही तर उघडल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच या फार्मा स्टॉकमध्ये २३३% पेक्षा जास्त वाढ झाली आणि तो $२४.८९ च्या पातळीवर पोहोचला. बाजारात जसजशी प्रगती होत गेली, तसतशी त्याची गती काहीशी मंदावली असली तरी एकूणच अमेरिकन शेअर बाजार बंद होताना हा शेअर १५६.३६% च्या वाढीसह १९.१५ डॉलरवर बंद झाला. या शेअरमुळे गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी भरीव नफा कमावला.

अमेरिकन फार्मा कंपनीच्या शेअर्समधील या तेजीमुळे, कंपनीच्या बाजार भांडवलातही वाढ झाली आणि मंगळवारीच त्याने $२४.८९ चा नवी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला सेलस लाईफ सायन्सेसचा शेअर एका दिवसात सर्वाधिक परतावा देणाऱ्या स्टॉक्सच्या यादीत अचानक अव्वल स्थानी पोहोचला. गुंतवणूकदारांनी कमावलेल्या नफ्याची गणना केल्यास जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये $१०,००० गुंतवले असते तर त्याचा नफा एका दिवसात $२५,६३६ पर्यंत वाढला असता.

या तेजीचे कारण काय?

अहवालानुसार, ही कंपनी कर्करोगाशी संबंधित औषधे तयार करते. या प्राणघातक आजारावरील लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत आणि ही बातमी पसरताच शेअर बाजारात हा स्टॉक खरेदी कारण्यासाठी गर्दी होऊ लागली. ही लस रक्ताच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकते रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, गॅलिनपेपिमुट-एस किंवा जीपीएस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लसीची चाचणी, कर्करोगावरील उपचारानंतर बरे झालेल्या परंतु अस्थिमज्जा किंवा स्टेम-सेल प्रत्यारोपण न झालेल्या अक्यूट मायलॉइड ल्युकेमिया (AML) च्या रुग्णांवर करण्यात आली. सेलास यांनी सांगितले की, १२६ रुग्णांवर केलेल्या चाचणीत, उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायी उपचारांच्या तुलनेत जीपीएसने मृत्यूचा धोका ४१% ने कमी केला. लस घेतलेले रुग्ण सरासरी २४ महिने जगले, तर नियंत्रण गटातील रुग्ण सरासरी १४.७ महिने जगले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >