कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाची जैन तीर्थक्षेत्रं असलेल्या बाहुबली आणि कुंथुगिरी यांच्या सर्वांगीण विकासाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत दोन्ही ठिकाणच्या एकूण १८ कोटी २० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. विधान भवनातील कॅबिनेट हॉलमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार डॉ. अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह वित्त आणि ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
बाहुबलीसाठी ९ कोटी
कसबा कुंभोज येथील श्री क्षेत्र बाहुबलीसाठी ९ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यात तीर्थक्षेत्र परिसरात पाथवे तयार करणं, शाळेच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक आणि काँक्रिटीकरण, भाविकांसाठी बाकड्यांची सोय, प्रशासकीय कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक आणि अंतर्गत रस्त्यांवर सोलर स्ट्रीट लाईट बसवणं यासारख्या कामांचा समावेश आहे. तसेच माईन कुंडी ते मुख्य मंदिरापर्यंतचा अंतर्गत सिमेंट रस्ता बांधला जाणार आहे. त्यामुळे भाविकांना ये-जा करणं अधिक सोपं होणार आहे.
Nitesh Rane : बंदर प्रकल्पांसोबत स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण द्या- मंत्री नितेश राणे
मुंबई : वाढवण, दिघी आणि कोकणातील प्रमुख बंदर प्रकल्पांच्या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणावर ...
कुंथुगिरीसाठी ९ कोटी २० लाख
हातकणंगले तालुक्यातील आळते येथील कुंथुगिरीसाठी ९ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांची कामं मंजूर झाली आहेत. मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक, अंतर्गत रस्ते आणि वाहनतळाचं काँक्रिटीकरण, उरलेली संरक्षण भिंत बांधणं ही कामं यात असतील. याशिवाय तिथे तीन हजार लोक बसू शकतील असं मोठं आरसीसी सत्संग भवन उभारलं जाणार आहे. धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांना याचा मोठा फायदा होईल. या निर्णयामुळे दोन्ही तीर्थक्षेत्रांवर येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.