
भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्यशाली इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. भारतीय नौदलाच्या दीर्घ पल्ल्याच्या सागरी टेहळणी मोहिमांनी आज आपल्या सेवेची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. हा ऐतिहासिक टप्पा नौदलाच्या हवाई पथक क्रमांक 312 म्हणजेच ‘अल्बाट्रॉस’ पथकाच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापन दिनाशी जुळून आला आहे. गेल्या पाच दशकांपासून हिंदी महासागर आणि त्याच्या पलीकडील सागरी क्षेत्रावर हवाई मार्गाने सातत्याने नजर ठेवून भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या या पथकाचा गौरव करण्यात येत आहे.
इ.स. 1971च्या युद्धानंतर किनारपट्टीवर आधारित सागरी गस्ती विमानांची तीव्र गरज भासू लागली. यातूनच 18 नोव्हेंबर 1976 रोजी गोव्यातील 'आयएनएस हंसा' येथे आयएनएएस 312 हे पथक अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आले. सुरुवातीला भारतीय हवाई दलाकडून हस्तांतरित करण्यात आलेली 5 लॉकहीड सुपर कॉन्स्टलेशन विमाने या पथकात सामील करण्यात आली होती.
काळानुरूप नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक विमानांचा समावेश होत गेला. इ.स. 1977 मध्ये इल्युशिन आयएल-38 विमाने दाखल झाल्यामुळे पाणबुडीविरोधी युद्धक्षमता अधिक मजबूत झाली. त्यानंतर इ.स. 1988 मध्ये आयएनएएस 312 मध्ये टुपोलेव्ह टीयू-142 एम विमानांचा समावेश करण्यात आल्याने गस्तीची व्याप्ती संपूर्ण हिंदी महासागरात पसरली. पुढे जाऊन इ.स. 2013 मध्ये अक्कोनम येथील 'आयएनएस राजाली' येथे अत्याधुनिक बोईंग पी-8आय विमाने दाखल झाली. या विमानांमुळे गुप्तचर माहिती संकलन, टेहळणी आणि सागरी हल्ल्याच्या क्षमतेत अभूतपूर्व क्रांती झाली.
उत्तर प्रदेश : रेल्वे प्रवासात नातेवाईकांना निरोप देण्यासाठी ट्रेनमध्ये चढणे 12 जणांना चांगलेच महागात पडले. उत्तर प्रदेशातील कानपूर सेंट्रल रेल्वे ...
गेल्या 5 दशकांच्या गौरवशाली प्रवासात नौदलाच्या या टेहळणी विमानांनी अनेक कठीण मोहिमा फत्ते केल्या आहेत. यात 'ऑपरेशन कॅक्टस', 'विजय', 'पराक्रम' आणि 'सिंदूर' यांसारख्या प्रमुख मोहिमांचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय चाचेगिरीविरोधी कारवाया आणि मानवी संकटाच्या वेळी शोध व बचाव कार्यामध्ये या विमानांनी मोलाचे योगदान दिले आहे.
सध्या अक्कोनम येथील आयएनएस राजाली येथे तैनात असलेले आयएनएएस 312 आणि गोव्याच्या आयएनएस हंसा येथील आयएनएएस 316 ही दोन्ही पथके आधुनिक पी-8आय विमानांच्या सहाय्याने अथांग समुद्रावर करडी नजर ठेवून आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वैमानिक, मोहिमांचे अधिकारी, तांत्रिक व देखभाल पथक आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या निस्सीम देशसेवेचा व बलिदानाचा यथोचित सन्मान केला जात आहे. यांच्याच अफाट पराक्रम आणि व्यावसायिक कौशल्यामुळे भारताच्या सागरी सीमा आज पूर्णपणे सुरक्षित आहेत.





