Wednesday, November 18, 2026

Nashik : मनमाड चौफुली परिसरात हुंदाई कार वाहतूक कंटेनरला आग, दीड कोटींचे नुकसान

नाशिक : मालेगाव शहरातील मनमाड - मालेगाव रस्त्यावरील मनमाड चौफुली नजीकच्या जीवन हॉस्पिटल समोर संदीप लॉजेस्टिक कंपनीच्या ह्युंदाई कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. महापालिका अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दीड तासानंतर दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आगीत अंदाजे दीड कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

संदीप लॉजेस्टिक कंपनीचा ह्युंदाई कार घेऊन जाणारा माल वहातूक कंटेनर (एच आर ४६ एफ ७६९२) मालेगावहून मनमाड कडे जात होता. कंटेनर मध्ये सात ह्युंदाई कार होत्या. कंटेनरला आग लागताच काही क्षणातच पोलीस नियंत्रण कक्षातून हवालदार हिरे व निकम यांनी मुख्य अग्निशमन केंद्र येथे ही माहिती कळवली.

माहिती मिळताच अग्निशमन अधिक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातून दोन अग्निशमन बंब कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तत्पूर्वी किल्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन जवानांनी घटनेचे गांभीर्य, तसेच वाहनां मधील इंधन लक्षात घेऊन चहूबाजूने होजपाईप व होजरीलच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

या दरम्यान कंटेंनरची टायर, आतील काही वाहने जळाल्याने सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीदेखील मनपा अग्निशमन दलाला साधारण ५० लाख रुपयाचा माल वाचवण्यात यश आले. आग विझवण्यास फायरमन मोहन बैरागी, याह्या खान, किरण सूर्यवंशी, सुनिल बागुल वाहन चालक प्रदीप शिंदे व जयेश सोनवणे यांनी परिश्रम घेतले. किल्ला पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >