मुंबई : राज्यातील ओबीसी आणि 18 पगड जातींच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या बांधकामासाठी 6,840 कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये या निधीचा समावेश करण्याबाबत महसूलमंत्री आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
Eknath Shinde : दुर्धर आजारांवरील उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळावेत, तसेच महागड्या उपचारांचा आर्थिक भार त्यांच्या कुटुंबीयांवर पडू नये, ...
ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी 18 तारखेला मंत्रालयात ही बैठक झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
शिष्यवृत्ती आणि महाज्योतीसाठी निधीची मागणी
केंद्र सरकारच्या एनएसपी पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 1,800 कोटी रुपयांची आवश्यकता असताना सध्या केवळ 83 कोटी रुपयांची तरतूद असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे हा निधी वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच महाज्योतीसाठी 700 कोटी रुपयांचा निधी, पुण्यातील प्रस्तावित संकुलासाठी जागा आणि प्रलंबित अनुशेष भरून काढण्याबाबतही चर्चा झाली.
जानेवारीत व्हिजेएनटी समाजासाठी विशेष शिबिरे
विमुक्त जाती आणि भटक्या जमातींमधील 43 जातींच्या नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी 6, 7 आणि 8 जानेवारी 2027 रोजी राज्यभरात सुमारे 500 विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून जन्मदाखले आणि आधार कार्ड मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेसाठी प्रत्येक सर्कलला 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
ओबीसी योजनांमधून बांधण्यात आलेल्या घरकुलांवर दोन महिन्यांत लाभार्थ्यांच्या नावाचे फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वसतिगृहांचे बांधकाम मार्चपासून सुरू होणार
प्रत्येक जिल्ह्यात 100 क्षमतेची, तर विभागीय स्तरावरील जिल्ह्यांत 250 क्षमतेची मुला-मुलींची वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएसआयडीसीने तयार केलेल्या आराखड्यानुसार मार्चपासून बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. ही वसतिगृहे पर्यावरणपूरक आणि सौरऊर्जेचा वापर करून उभारण्याच्या सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या. 30 डिसेंबरपर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मार्चच्या अर्थसंकल्पात 10 नवीन वसतिगृहांसाठी तरतूद करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
गोरेगाव येथील न्यूझीलंड वसतिगृहातील 80 खोल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाला देण्याबाबत पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ए-कॅपची फाईल अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. लक्ष्मण हाके यांच्या मागण्याही पूर्ण केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यासोबतच 9 टक्के आरक्षणाचा नव्याने अभ्यास करून प्रस्ताव सांख्यिकी विभागाकडे सादर करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी दिल्या.
महायुतीतील नेत्यांवरील टीका सहन करणार नाही
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी महायुतीतील समन्वयाबाबतही भूमिका स्पष्ट केली. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत तिन्ही पक्षांनी मित्रपक्षांच्या नेत्यांवर जाहीर टीका करू नये, असा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर विरोधकांकडून किंवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका झाल्यास तिन्ही पक्ष एकत्रितपणे उत्तर देतील, असेही ते म्हणाले.
रोहित पवारांनी माफी मागावी, बावनकुळेंची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी ते रोहित पवार यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले असले, तरी त्यांनी शरद पवार यांनी दिलेले संस्कार पाळावेत आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
महिलांबाबतच्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध
शायना एनसी यांच्याशी संबंधित घटनेवरून संजय राऊत यांनी वापरलेल्या भाषेचा बावनकुळे यांनी निषेध केला. महिलांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे ते म्हणाले.
सातारा जिल्हा बँकेतील घडामोडींवर भाष्य
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील यांची निवड झाल्याबाबत विचारले असता, स्थानिक नेत्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी महायुतीचे प्रमुख नेते लवकरच एकत्र बसून चर्चा करतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील महायुतीतील समन्वय कायम राखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.