Thursday, November 19, 2026

दिल्ली विमानतळावर सुरक्षा भेदून आत घुसण्याचा प्रयत्न! CISF जवानांनी काही सेकंदांत पकडला तरुण

दिल्लीच्या IGI विमानतळावरील टर्मिनल-3 मध्ये वैध प्रवास कागदपत्रांशिवाय जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हरियाणातील तरुणाला CISF जवानांनी पकडले. जवानांच्या तत्पर कारवाईमुळे काही सेकंदांतच त्याला रोखण्यात आले. तरुणाला दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, त्याच्या बॅगेत ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि भरती व शिक्षणासंबंधी अर्ज आढळले.

नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे सुरक्षा यंत्रणेला चकमा देत जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडले. बुधवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या डिपार्चर गेटवर हा प्रकार घडला. संबंधित तरुणाकडे प्रवासासाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हरियाणातील रहिवासी असलेल्या या तरुणाने टर्मिनलमध्ये प्रवेश करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्का देत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमानतळावर तैनात CISF जवानांनी तत्परता दाखवत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाजूला ढकलत काही मीटर आत धाव घेतली. त्यानंतर अन्य जवानांनीही घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

CISF ने या घटनेचा 35 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये संबंधित तरुण सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्का देत विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जवानांनी त्याला रोखण्यासाठी तत्काळ हालचाल केली आणि क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) च्या मदतीने काही सेकंदांतच त्याला पकडले.

?feature=share

CISF ने दिलेल्या माहितीनुसार, जवानांच्या सतर्कतेमुळे अनधिकृत प्रवेश रोखण्यात आला आणि संभाव्य सुरक्षा उल्लंघन टळले. विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानांनी त्वरित कारवाई केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

ताब्यात घेतलेल्या तरुणाला पुढील चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये वैयक्तिक ओळखपत्रे, मोबाइल फोन, शैक्षणिक आणि क्रीडा प्रमाणपत्रे तसेच उच्च शिक्षण आणि भरतीसाठीचे अर्ज आढळून आले.

या तरुणाने विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून प्रवेश करण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणासाठी केला, याचा तपास दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे. CISF च्या तत्पर कारवाईमुळे विमानतळावरील संभाव्य सुरक्षा धोका टळल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >